ऑक्सिजन असलेल्या खासगी रुग्णवाहिकांकडून नातेवाईकांची परवड; दरामध्ये आढळते तफावत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:20 IST2021-04-21T04:20:27+5:302021-04-21T04:20:27+5:30
लातूर : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची सेवा महत्वाची ठरते. अशा ...

ऑक्सिजन असलेल्या खासगी रुग्णवाहिकांकडून नातेवाईकांची परवड; दरामध्ये आढळते तफावत !
लातूर : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची सेवा महत्वाची ठरते. अशा संकटकाळातही खाजगी रुग्णवाहिकांकडून आकारण्यात येणाऱ्या दराबाबत तफावत असल्याचे समोर आले आहे. परिणामी, रुग्णांच्या नातेवाईकांची परवड होत आहे.
रुग्णसेवा हा प्रमुख केंद्रबिंदू आहे. मात्र काही रुग्णवाहिका चालकांकडून एक ते दोन किलोमीटरच्या अंतरासाठी जवळपास दीड ते दोन हजार रुपयांचे भाडे आकारले जात असल्याचे समोर आले आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना अशी बंधने फारशी पाळली जात नसल्याचे दिसून येत आहे. या दरावर नेमके कोणाचे नियंत्रण आहे, हा विषय सध्या चर्चेत आहे. रुग्णांना योग्य त्या दरात सेवा मिळणे गरजेचे आहे.
शासकीय रुग्णालयातील एखाद्या रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल करायचे असेल तर ऐनवेळी खासगी रुग्णवाहिका मागविण्याची वेळ नातेवाईकांवर येते. अशावेळी रुग्णवाहिका चालकाकडून मागेल त्या दराबाबत होकार द्यावा लागतो आणि वेळ मारून न्यावी लागते. यावर नियंत्रण नसल्याचे दिसते.
प्रत्येक ठिकाणी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध होते, असे नाही. काहीवेळा अत्यावश्यक सेवा म्हणून खासगी रुग्णवाहिकेचा नातेवाईकांना आधार घ्यावा लागतो. अशावेळी एका किलोमीटरसाठी एक ते दीड हजार रुपये मोजण्याची वेळ त्यांच्यावर येते.
तक्रार कुठे करायचे?
खासगी रुग्णवाहिकेसंदर्भात संबंधित विभागाकडे नातेवाईकांना तक्रार करता येते. मात्र उपचाराला प्राधान्य दिले जात आहे.
दरात असलेल्या तफावतीबाबत संबंधित प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.
शासकीय सर्वोपचार रुग्णालय ते सूतमिल रोड हे अंतर जवळपास एक ते दीड किलोमीटरचे आहे. रुग्णाला घरी घेऊन जाण्यासाठी खासगी रुग्णवाहिका चालकाकडून जवळपास एक हजार रुपयांचा दर आकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. दराबाबत निश्चित धोरण जाहीर करावे.