कोविड लसीकरण मोहिमेसाठी प्रशासन फिरतेय दारोदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:18 IST2021-04-13T04:18:44+5:302021-04-13T04:18:44+5:30
जळकोट तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. तालुक्यातील एकुरका, शिंदगी, वांजरवाडा येथे कोरोना बाधितांची संख्या जास्त आढळून येत आहे. संसर्ग ...

कोविड लसीकरण मोहिमेसाठी प्रशासन फिरतेय दारोदार
जळकोट तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. तालुक्यातील एकुरका, शिंदगी, वांजरवाडा येथे कोरोना बाधितांची संख्या जास्त आढळून येत आहे. संसर्ग रोखण्यासाठी आणि ४५ वर्षांपुढील नागरिकांनी कोविड लस घ्यावी म्हणून प्रशासनाकडून जनजागृती करुन आवाहन करण्यात येत आहे. रविवारी अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी येथे बैठक घेऊन लसीकरणासाठी जनजागृती करावी तसेच संसर्ग रोखण्यासाठी उपायोजना कराव्यात, अशा सूचना केल्या होत्या.
त्यानुसार सोमवारी तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी शिंदे, माजी नगराध्यक्ष व्यंकट तेलंग आदींनी शहरातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून कोरोना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले. कोरोनासंदर्भात प्रशासन जनतेच्या दारी ही संकल्पना राबविण्यात येत आहे. सर्व अधिकारी जळकोट, पाटोदा, कोळनुर आदी गावांत जाऊन घरोघरी जनजागृती करणार आहेत. नागरिकांनी शासन नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.