किनगाव
:
प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी जिल्ह्यामध्ये केंद्रप्रमुखांची १०२ पदे मंजूर असून, सद्यस्थितीत ७३ पदे रिक्त असल्याने जिल्ह्यातील २९ केंद्रप्रमुखांवर अतिरिक्त कामाचा भार पडला आहे. जिल्ह्यात २५ वरिष्ठ विस्तार अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून, त्यापैकी १७ कार्यरत आहेत.
अहमदपूर तालुक्यांमध्ये १४ केंद्रप्रमुखांची पदे मंजूर असून, सद्यस्थितीमध्ये २ केंद्रप्रमुख कार्यरत आहेत. तसेच तालुक्यामध्ये पाच शिक्षण विस्ताराधिकारी पदे मंजूर असून, चार पदे रिक्त असल्याने अतिरिक्त पदभार कार्यरत केंद्रप्रमुखांवर पडल्याने कामाचा ताण वाढला आहे.
शाळेमध्ये शासनाचे विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यास शिक्षकांना प्रोत्साहित करण्यामध्ये केंद्रप्रमुखांचा महत्त्वाचा वाटा असतो. समुपदेशन करणे, प्रेरणा देणे, प्रोत्साहन देणे, शाळेतील विविध कार्यक्रमांचे अहवाल शासनास सादर करणे, अशी शैक्षणिक कामे केंद्रप्रमुखांना पार पाडावी लागतात.
शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख हे गटशिक्षणाधिकाऱ्यांना विविध शाळानिहाय शैक्षणिक माहिती पुरविण्याचे काम करतात.
सद्यस्थितीमध्ये गंगाहिप्परगा व रोकडासावरगाव येथील एकूण दोनच केंद्रप्रमुख कार्यरत असून, पदे रिक्तमध्ये अहमदपूर, नांदुरा, सताळा, चिखली, कोपरा, सांगवी, थोडगा, हिप्पळगाव, शिरुर ता., कुमठा, वळसंगी आणि ढाळेगाव या ठिकाणची केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. तालुक्यामध्ये पाच बीट असून, जिल्हा परिषदेच्या १७२ शाळा आहेत, तर इतर खासगी संस्थाही आहेत. तालुक्यामध्ये विस्तार अधिकाऱ्यांची पाच पदे मंजूर असून, चार पदे रिक्त आहेत. हीच परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये आहे. रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी होत आहे.
रिक्त पदे भरण्याची मागणी...
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम रावबिले जातात. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंदच आहेत. त्यामुळे ऑनलाईन अभ्यास सुरू आहेत. मात्र, तालुक्यात रिक्त असलेल्या पदांमुळे शिक्षक, मुख्याध्यापकांवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे या बाबींचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. परिणामी, शिक्षण विभागाने रिक्त असलेली पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही.