कोविड लसीकरणास वेग; सव्वा लाखांचा टप्पा पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:20 IST2021-04-08T04:20:24+5:302021-04-08T04:20:24+5:30
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे चिंता कायम आहे. दरम्यान, लसीकरणाचाही वेग वाढला असून, १ लाख ३१ ...

कोविड लसीकरणास वेग; सव्वा लाखांचा टप्पा पूर्ण
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे चिंता कायम आहे. दरम्यान, लसीकरणाचाही वेग वाढला असून, १ लाख ३१ हजार ६०९ जणांनी लसीकरण करून घेतले आहे. यात ज्येष्ठ नागरिक आघाडीवर आहेत.
फ्रंटलाईनमध्ये जिल्हा परिषद, पोलीस, शिक्षक अशा ठराविक कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. लसीकरणाला आणखीन वेग देण्यासाठी बँक कर्मचारी, किराणा, मेडिकल दुकानदार, पत्रकारांचा समावेश करणे गरजेचे ठरत आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरणास सुरुवात झाली. सुरुवातीस शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयासह मोजक्याच खाजगी दवाखान्यांतून लस देण्यास सुरुवात झाली. लसीकरणाचा वेग वाढावा म्हणून शासनाने लसीकरण केंद्रात वाढ केली. सध्या जिल्ह्यातील १७० केंद्रांत लसीकरण केले जात आहे. त्यात १६ खाजगी दवाखाने असून, खाजगीमध्ये विकत लसीकरण करून घ्यावे लागत आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात २६ हजार ५३९ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेतले आहे. तसेच २१ हजार ७८६ फ्रंटलाईन वर्करनी ही लस घेतली आहे. ५५ हजार ६२१ ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. तसेच ४५ ते ६० वयोगटांतील ११ हजार ३७४ जणांनी सदरील लस घेतली आहे. शासनाकडून जिल्ह्यास कोव्हॅक्सिन तसेच कोविशिल्ड या दोन लसी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. दररोज साधारणत: ६ हजार व्यक्तींना लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.