डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्याच्या हलचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:19 IST2021-04-16T04:19:08+5:302021-04-16T04:19:08+5:30
तालुक्यातील काेरोना बाधितांची संख्या १ हजार १०८ वर पोहोचली आहे. ६६८ जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ४१७ ...

डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्याच्या हलचालींना वेग
तालुक्यातील काेरोना बाधितांची संख्या १ हजार १०८ वर पोहोचली आहे. ६६८ जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ४१७ ॲक्टिव्ह रुग्ण असून २३ जणांना रेफर करण्यात आले आहे. ४५ जण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. बुधवारी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत जळकोटला डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच पालकमंत्री अमित देशमुख यांनाही साकडे घालण्यात आले. तेव्हा सदरील हॉस्पिटल लवकरच सुरु होईल, असे राज्यमंत्री बनसोडे म्हणाले. यासंबंधी त्यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांना सूचनाही केल्या.
शहरासह एकुर्का, वांजरवाडा, धामनगाव, शिंदगी येथेही कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे सदरील हॉस्पिटल निर्माण होणे गरजेचे आहे, अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, खादरभाई लाटवाले, संग्राम कदम आदींनी केली होती.
आरोग्य उपसंचालक आज जळकोटात...
डेडीकेटेड हॉस्पिटलसंदर्भात लोकमतमधून वृत्त प्रकाशित झाल्याने त्याची दखल घेऊन पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आरोग्य विभागास सूचना केल्या आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, डॉ. निलिमा कंटे यांच्याशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे राज्यमंत्री बनसोडे व आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी सांगितले. दरम्यान, जळकोटातील कोविडचा आढावा घेण्यासाठी तसेच जागेची पाहणी करण्यासाठी डॉ. माले हे शुक्रवारी जळकोटला येत आहेत.