लातूर : छावाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे- पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यास झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण अखेर सापडला आहे. त्याला पोलिसांनी बुधवारी पहाटे ताब्यात घेतले. या प्रकरणात एकूण ११ पैकी चव्हाण यांच्यासह १० आरोपींवर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांना पुन्हा चौकशीसाठी केव्हाही बोलवले जाऊ शकते.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या दौऱ्यात छावाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. घाडगे पाटील यांनी निवेदन देताना पत्ते टाकून भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच कृषीमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर बाजूच्या विश्रामगृहात थांबलेल्या ॲड. घाडगे पाटील व त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यात जखमी झालेले ॲड. घाडगे पाटील रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी माजी प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह लाला सुरवसे, शुभम रेड्डी, अमित क्षीरसागर, ताज शेख, अभिजित सगरे पाटील, सिद्दीक मुल्ला, वसीम मुल्ला, रवी धुमाळ, राजू बरगे यांना ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. अहेमद शेख याची ओळख पटलेली नाही.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, विवेकानंद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्यासह तपास पथके इतर आरोपींचा शोध घेत आहेत.