सामाजिक सलोख्याची अनोखी परंपरा; हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन साजरा करतात मोहरम
By संदीप शिंदे | Updated: August 9, 2022 19:17 IST2022-08-09T19:17:15+5:302022-08-09T19:17:53+5:30
मसलगा येथे दोन्ही समजातील तिसऱ्या पिढीकडून परंपरा कायम

सामाजिक सलोख्याची अनोखी परंपरा; हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन साजरा करतात मोहरम
निलंगा : तालुक्यातील मसलगा येथील हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गेल्या तीन पिढ्यांपासून परंपरा कायम असून, मंगळवारी पुन्हा एकदा हिंदू- मुस्लिम एकतेचे दर्शन घडून आले.
मोहरम या सणाचे डोला हे विशेष आकर्षण आहे. सुलतान सय्यद, बालाजी पिंड, नागनाथ नरहरे, हनुमंत पिंड, दस्तगीर शेख, गुरुनाथ पिंड, परमेश्वर पवार, शिवाजी पवार, तानाजी शिंदे, गोविंद शिंदे यांनी आपल्या हातची कलाकुसर दाखवत आकर्षक डोला तयार केला होता. सजवण्यात आलेला डोला हा गावातील प्रत्येकाच्या दारापर्यंत नेण्यात आला. यावेळी नागरिकांनी दर्शन घेतले.
याप्रसंगी मोहरम उत्सव समितीचे अध्यक्ष सुलतान सय्यद, उपाध्यक्ष बालाजी पिंड, सरपंच प्रतिनिधी रमेश पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष मोहनराव पिंड, दिनकर पाटील, पोलीस पाटील संतोष नरहरे, छावाचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके, विलास पाटील, गुरुनाथ जाधव आदींसह हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते.