राजकुमार जाेंधळे / लातूर : भरधाव कारने उडवल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अहमदपूर शहरात लातूर-नांदेड राेडवर शनिवारी सायंकाळी घडली. रहिम अलीम शेख (वय २०) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
अहमदपूर येथील ईदगाह रोड, उमर कॉलनीत राहणारा रहिम अलीम शेख हा युवक एका गॅरेजवर काम करत होता. दरम्यान, शनिवारी सायंकाळी ५ वाजता गॅरेजवरील काम आटाेपल्यानंतर ताे घराकडे पायी निघाला हाेता. लातूर-नांदेड रोडवरील कासनाळे पेट्रोल पंपासमोर आला असता नांदेडकडून अहमदपूरकडे येणाऱ्या एका भरधाव कारने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये रहिम शेख या युवकाचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरून कारचालकाने पलायन केले. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात मात्र रात्री उशिरपर्यंत अपघाताची नाेंद करण्यात आली नव्हती.