९५ वर्षीय आजी अन् कुटुंबाची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:20 IST2021-05-11T04:20:11+5:302021-05-11T04:20:11+5:30
औसा तालुक्यातील बेलकुंड येथील गंगाबाई बाबराव कुंभार (वय ९०) यांचा एक मुलगा बाहेरगावी राहत असून, एक मुलाचे १० वर्षांपूर्वी ...

९५ वर्षीय आजी अन् कुटुंबाची कोरोनावर मात
औसा तालुक्यातील बेलकुंड येथील गंगाबाई बाबराव कुंभार (वय ९०) यांचा एक मुलगा बाहेरगावी राहत असून, एक मुलाचे १० वर्षांपूर्वी निधन झाले आहे. गंगाबाई या सून व तीन नातवंडांसह गावात राहतात. दरम्यान, २५ एप्रिल रोजी त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता अहवाल पॉझिटिव्ह आला.
याशिवाय, घरातील अन्य तिघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे घरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. गंगाबाईंचे वय जास्त असल्याने आणि घरात लहान मुले असल्यामुळे त्यांना कोविड केअर सेंटरला हलविण्याच्या हलचाली सुरू झाल्या. मात्र, आपण गृहविलगीकरणात राहून औषधोपचाराने कोरोनावर मात करू, असा निश्चय त्यांनी केला. त्यामुळे बाधित सर्वांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आणि औषधोपचार सुरू केले. दरम्यान, आशा स्वयंसेविकांनी समुपदेशन केल्याने मानसिक आधार वाढून त्यांची प्रकृती सुधारली. त्यातून त्यांनी कोरोनावर मात केली.
औषधे नियमित घ्यावीत...
गृहविलगीकरणात असताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू झाले. त्याचे नियमित सेवन केले. तसेच वेळेवर सकस आहार, गरम पाण्याची वाफ घेतली. सुरुवातीचे दोन दिवस अस्वस्थ वाटत होते. तेव्हा जेवण्याची इच्छाही होत नसे; पण कोरोनाला न घाबरता औषधोपचार आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर मात केली असल्याचे गंगाबाई कुंभार यांनी सांगितले.