९३ वर्षीय आजीची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:15 IST2021-05-31T04:15:48+5:302021-05-31T04:15:48+5:30
किनगाव : अचानक अंगात ताप भरला. त्यामुळे त्रास जाणवू लागला. कोविड चाचणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे ...

९३ वर्षीय आजीची कोरोनावर मात
किनगाव : अचानक अंगात ताप भरला. त्यामुळे त्रास जाणवू लागला. कोविड चाचणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे कुटुंबीयही घाबरले; पण प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील ९३ वर्षीय आजीने कोरोनावर मात केली आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. मात्र, एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीच्या कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव शहराबरोबर ग्रामीण भागात वाढला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना धास्ती बसली होती. बालके आणि ज्येष्ठ नागरिकांची अधिक काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता. त्यामुळे प्रत्येक जण स्वत:ला जपत होता.
अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील ९३ वर्षीय पार्वतीबाई त्र्यंबक कराड या आपल्या गावीच होत्या. शरीर प्रकृती तंदुरुस्त होती. स्वतःची कामे त्या स्वतः करीत असत. दरम्यान, अचानकपणे त्यांना ताप आला. तो १०२ पर्यंत पोहोचला होता. त्यामुळे काही प्रमाणात अशक्तपणा जाणवू लागला. कोविडच्या लक्षणात ताप असल्याने कुटुंबीय घाबरले आणि तात्काळ त्यांची कोरोना चाचणी करून घेतली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कुटुंबीयांकडून दवाखान्यात खाटांचा शोध घेण्यास सुरुवात झाली.
अशा परिस्थितीत डॉक्टरांनी सौम्य लक्षणे असल्याने दवाखान्याऐवजी गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला. शिवाय, औषधीही दिली. डॉक्टरांच्या सल्ल्याने गृहविलगीकरणात त्या एक महिना पाच दिवस राहिल्या. डॉक्टरांनी सांगितलेली औषधी त्या नियमिपणे घेत असत, तसेच आरोग्य कर्मचा-यांकडून नियमित तपासणीबरोबर मानसिक आधारही मिळत असे. सुरुवातीपासूनच कोविडवर मात करणार, अशी जिद्द असल्याने त्या ठणठणीत बऱ्या झाल्या. त्यामुळे कुटुंबीयांत आनंद पसरला आहे.
प्रबळ इच्छाशक्तीवर तंदुरुस्त...
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक महिना पाच दिवस गृहविलगीकरणात राहिले. या काळात कुटुंबीयांनी योग्य ती काळजी घेतली. सुरुवातीस मनावर दडपण होते; परंतु वेळेवर आहार, औषधी घेतली. मनामध्ये आत्मविश्वास असल्याने त्या बळावर मी कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोणीही कोरोनास घाबरू नये. कुठलीही लक्षणे जाणवू लागताच तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत. वेळीच उपचार घेतल्यास निश्चित बरे होता येते.
-पार्वतीबाई कराड, चिखली