गृह विलगीकरणात राहून ९० वर्षीय चव्हाण दाम्पत्याची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST2021-04-30T04:24:51+5:302021-04-30T04:24:51+5:30
सिद्राम जेमला चव्हाण (वय ९०) आणि भुराबाई सिद्राम चव्हाण (८७) असे कोरोनावर मात केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. रेणापूर तालुक्यातील ...

गृह विलगीकरणात राहून ९० वर्षीय चव्हाण दाम्पत्याची कोरोनावर मात
सिद्राम जेमला चव्हाण (वय ९०) आणि भुराबाई सिद्राम चव्हाण (८७) असे कोरोनावर मात केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथे कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. पोहरेगाव व तांड्यावर आतापर्यंत दीडशेच्या जवळपास कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. पोहरेगाव तांडा येथील सिद्राम चव्हाण व त्यांची पत्नी भुराबाई चव्हाण यांना ७ एप्रिल रोजी ताप, अंगदुखी, डोकेदुखी असा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी पोहरेगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तेथील डॉक्टरांना सांगितले. तेव्हा कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने कोविड चाचणी करण्यात आली. तेव्हा दाेघांनाही कोविड झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यातच सिद्राम चव्हाण यांना दमा आणि मधुमेहाचा आजार. ही माहिती कुटुंबीयांना समजली. त्यामुळे गावात व तांड्यावर भीतीचे वातावरण पसरले. कुटुंबीयांना तर अश्रू आवरेनात. मात्र, या दाम्पत्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एन. कुलकर्णी व डॉ. बिभीषण जाधव यांनी समजावून सांगितले. त्यानंतर गोळ्या, औषधे देऊन ती कशी घ्यायची हे सांगितले आणि त्यांना गृह विलगीकरणात राहण्यास सांगितले. डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे या दाम्पत्याने १८ दिवस गृह विलगीकरणात राहून उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी कोरोनावर मात करीत ठणठणीत झाले आहेत.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार राहिलो...
कोरोना झाल्याचे समजताच कुटुंबात रडण्यास सुरुवात झाली. तेव्हा जावई शरद राठोड यांनी या आजारासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर डॉक्टरांनी गोळ्या, औषधे देऊन आराम करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी मनातील भीती दूर केली. त्यामुळे आम्हीही धैर्य सोडले नाही. १८ दिवस वेगळे राहून कोरोनावर मात केली असल्याचे सिद्राम चव्हाण यांनी सांगितले.