विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत सोमवारी ४४८ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर ५६४ व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली, त्यात शून्य रुग्ण आढळले आहेत. दोन्ही चाचण्यांत मिळून नऊ रुग्ण आढळले आहेत, तर आतापर्यंत २२२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, सोमवारी घेतलेल्या प्रयोगशाळेतील चाचणीचा पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्के आहे, तर रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह शून्य टक्के आहे. दरम्यान, सोमवारी प्रकृती ठणठणीत बनल्याने १४ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२३ टक्के आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी दिली.
नियमित मास्क वापरण्याचे आवाहन
कोरोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नाही. शून्य टक्के रुग्णसंख्या आणण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरणे व सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे आहे. सध्या जिल्ह्यात १२४ रुग्ण उपचाराधीन आहेत. रुग्णसंख्या कमी झाली आहे. परंतु संसर्ग सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सुरक्षित अंतर पाळावे आणि वारंवार हात धुवावेत, या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.