औराद, शिरुर अनंतपाळच्या ग्रामीण रुग्णालय बांधकामासाठी ९ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:19 IST2021-04-11T04:19:12+5:302021-04-11T04:19:12+5:30
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा प्राप्त होऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या भागांमध्ये शासनाच्या वतीने रुग्णालयांची उभारणी होणे ...

औराद, शिरुर अनंतपाळच्या ग्रामीण रुग्णालय बांधकामासाठी ९ कोटी मंजूर
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा प्राप्त होऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या भागांमध्ये शासनाच्या वतीने रुग्णालयांची उभारणी होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मतदारसंघातील औराद शहाजानी व शिरुर अनंतपाळ या मोठ्या गावांमध्ये रखडलेल्या ग्रामीण रुग्णालयांच्या उभारणीसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावाला तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालिन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत व एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली होती. त्या अनुषंगाने हा निधी मिळावा, यासाठी आ. निलंगेकर यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. दरम्यान, वर्षभरापासून कोरोनाच्या संसर्गामुळे या रुग्णालयांची उभारणी लवकरात लवकर होऊन ती रुग्णसेवेत सुरू होणे गरजेचे होते. ही बाब लक्षात घेऊन आ. निलंगेकर यांनी तत्काळ उर्वरित कामाच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्यास यश आले आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालिन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आ. निलंगेकर यांनी आभार व्यक्त केले.
लवकरच रुग्णालये रुग्णसेवेत...
शासनाने या दोन्ही रुग्णालयाच्या प्रलंबित कामांसाठी निधी मंजूर केला आहे. औराद शहाजानी ग्रामीण रुग्णालयासाठी ३ कोटी ५१ लाख ३९ हजार ४१४ तर शिरुर अनंतपाळ येथील ग्रामीण रुग्णालयाकरिता ५ कोटी ७२ लाख ७६ हजारांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. या रुग्णालयांकरिता आवश्यक असणारा निधी मंजूर झाल्याने आता ही रुग्णालये अधिक गतीने उभारण्यात येऊन ती लवकरच रुग्णसेवेत लोकार्पण करण्यात येतील, अशी माहिती माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.