८३ वर्षीय गुरुजींनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST2021-05-05T04:32:21+5:302021-05-05T04:32:21+5:30
तांदुळजा : अचानकपणे अंगात ताप भरला आणि ऑक्सिजनची पातळी ६९ वर आली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने सिटी स्कॅन ...

८३ वर्षीय गुरुजींनी केली कोरोनावर मात
तांदुळजा : अचानकपणे अंगात ताप भरला आणि ऑक्सिजनची पातळी ६९ वर आली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने सिटी स्कॅन करण्यात आले तेव्हा स्कोअर १७ आला. त्यामुळे कुटुंबीय घाबरले. मात्र, प्रबळ इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारसरणीमुळे भोसा (ता. लातूर) येथील ८३ वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक शंकर मांडे यांनी कोरोनावर मात केली आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट शहराबरोबरच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्यामुळे प्रत्येकास धास्ती बसली आहे. ज्येष्ठ नागरिक नेहमी चिंता व्यक्त करत आहेत. लातूर तालुक्यातील भोसा येथील रहिवासी आणि मुरुडच्या जनता विद्यामंदिरचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शंकर मांडे हे सध्या ८३ वर्षांचे आहेत. सेवानिवृत्तीमुळे ते भोसा या गावीच राहतात. त्यांना कुठलेही व्यसन नसल्याने आणि दररोज दंड बैठका मारत स्वत:ची कामे स्वत: करत असल्याने आजपर्यंत त्यांना कुठलाही आजार झाला नव्हता. सतत कामात व्यस्त राहणे तसेच वाचन करण्याची आवड आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना ताप भरली. ऑक्सिजन पातळी ६९ वर आली आणि सिटी स्कॅन स्कोर १७ आल्यामुळे कुटुंबीयांना धास्तीच बसली. त्यामुळे त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहिल्यांदाच ते एवढे आजारी असल्याने कुटुंबीय चिंतीत झाले होते. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे व्हेंटिलेटर लावण्यात आले. त्यानंतर ते दोन दिवसांनी शुद्धीवर आले. अशा परिस्थतीत त्यांनी प्रबळ इच्छाशक्ती बाळगून डॉक्टरांनी दिलेली औषधी नियमितपणे घेतली. त्यामुळे ८ दिवसांत ते पुन्हा ठणठणीत झाले आहेत.
व्यायाम पूर्ववत सुरू...
प्रबळ इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारसरणीमुळे मी ठणठणीत झालो आहे. सकस आहार आणि व्यायाम पूर्ववत सुरू केला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे घाबरू नये. तत्काळ नजीकच्या दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत. त्यामुळे कोरोनावर मात करता येते. सध्याच्या परिस्थितीत कुठलाही आजार अंगावर काढू नका, असे शंकर मांडे यांनी सांगितले.