बनशेळकी तलावात ७२ टक्के पाणीसाठा, उदगीरची तहान एकाच तलावावर ।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:20 IST2021-04-07T04:20:15+5:302021-04-07T04:20:15+5:30
गत पावसाळयात समाधानकारक पावसाने हजेरी लावाल्याने दोन्ही तलाव तुडूंब भरले हाेते. सद्यस्थितीत बनशेळकी तलावात ७२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...

बनशेळकी तलावात ७२ टक्के पाणीसाठा, उदगीरची तहान एकाच तलावावर ।
गत पावसाळयात समाधानकारक पावसाने हजेरी लावाल्याने दोन्ही तलाव तुडूंब भरले हाेते. सद्यस्थितीत बनशेळकी तलावात ७२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शहरात ८ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे चित्र आहे. मात्र, भोपणी तलावातून होणारा पाणीउपसा गत १५ दिवसांपासून खंडित करण्यात आलेल्या वीजपुरवठ्यामुळे बंद आहे. येथील पाणीपुरवठा याेजनेनेचे वीजबिल भरण्यात न आल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी, सध्या बनशेळकी तलावातील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. एकाच तलावातील पाणीउपसा हाेत असल्याने दिवसेंदिवस झपाट्याने बनशेळकी तलावातील पाणीपातळी खालावत आहे. बनशेळकी तलावातील पाणी उपसा करण्यासाठी जुन्या मोटारी आणि वीजपुरवठा खंडित होणे या प्रमुख अडचणींमुळे पाणीपुरवठा यंत्रणा खंडित होत आहे. मध्यंतरी वीजपुरवठा खंडित होणे आणि तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा कालावधी वाढला होता. मात्र, तो आता आटोक्यात येत आहे.
यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न...
थकीत वीजबिलापाेटी खंडित करण्यात आलेल्या वीजपुरवठ्यामुळे भोपणी तलावातील पाणीउपसा बंद झाला आहे. परिणामी, बनशेळकी तलावातील पाण्याच्या उपशावरीही तांत्रिक अडचणी येत आहेत. मात्र, प्रशासन लवकरच सदरची यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, पाण्याचा अपव्यय टाळून सहकार्य करावे, असे आवाहन उदगीर नगर परिषदेतील पाणीपुरवठा सभापती मनोज पुदाले म्हणाले.