घराचे कुलूप तोडून सात तोळे सोने, ६० हजार पळविले
By आशपाक पठाण | Updated: May 14, 2023 20:51 IST2023-05-14T20:51:21+5:302023-05-14T20:51:33+5:30
लातूर शहरातील रियाज कॉलनी येथील घटना.

घराचे कुलूप तोडून सात तोळे सोने, ६० हजार पळविले
लातूर : घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्याचे सात तोळ्यांचे दागिने, रोख ६० हजार रुपये लंपास केल्याची घटना लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवरील रियाज कॉलनी येथील अलअजीम अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर घडली. या घटनेत जवळपास २ लाख ७० हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी समीर अल्लाउद्दीन मुलाणी हे सोलापूर महापालिकेत तांत्रिक तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. १२ मे रोजी त्यांनी लातूर येथील आपल्या घराच्या गेटला कुलूप लावून कुटुंबासह कार्यक्रमाला सोलापूर येथे गेले होते. १३ मे रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास परत आल्यावर पाहिले असता घराचे चॅनेल गेटच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेतून प्रवेश करीत लाकडी दरवाजाचा कोयंडा, कुलूप तुटलेला दिसला. त्यानंतर बेडरुममध्ये पाहिले असता तेथील कपाटातील सर्व सामान बाहेर फेकण्यात आल्याचे निदर्शनास आले.
त्यावेळी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले साडेतीन तोळ्याचे राणीहार, कुवेती नेकलेस २१ ग्रॅम, कानातील तीन जोड दागिने असे एकूण ७ तोळ्याचे सोन्याचे दागिने व कपाटातील रोख ६० हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेल्याचे आढळून आले. यासंदर्भात समीर मुलाणी यांनी तत्काळ शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी फिंगरप्रिंट घेतले...
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, उपनिरीक्षक पंकज नीळकंठे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच फिंगरप्रिंट घेतले आहेत. घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.