७ किमी रस्त्याचे काम दोन वर्षांपासून अर्धवट स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:19 IST2021-04-10T04:19:46+5:302021-04-10T04:19:46+5:30
निलंगा शहरातून असलेल्या लातूर- बिदर रस्त्यावरील खरोशाकडे जाणाऱ्या मार्गावरील ७ किमी अंतरापर्यंतच्या डागडुजीसाठी दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २ ...

७ किमी रस्त्याचे काम दोन वर्षांपासून अर्धवट स्थितीत
निलंगा शहरातून असलेल्या लातूर- बिदर रस्त्यावरील खरोशाकडे जाणाऱ्या मार्गावरील ७ किमी अंतरापर्यंतच्या डागडुजीसाठी दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २ कोटी ५० लाख काम मंजूर झाले होते. मात्र, संबंधित गुत्तेदाराने दोन वर्षांत केवळ थातूरमातूर काम केले. तेही अर्धवट स्थितीत आहे. याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्यासंदर्भात वृत्तपत्रांतून वारंवार वृत्त प्रकाशित होताच थोडे- थोडे काही ठिकाणी काम करण्यात आले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अद्याप मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे काम कधी पूर्ण होणार, असा सवाल नागरिकांतून होत आहे. दरम्यान, या कामास विलंब होत असल्याने विविध पक्ष, संघटनांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने हे काम अद्याप अर्धवट आहे. सदरील गुत्तेदारास नोटीस काढून हे काम पूर्ण करुन घ्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
हा मार्ग आंध्रप्रदेश, कर्नाटक व तेलंगणा या तीन राज्यांना जोडणारा आहे. या मार्गावर सतत मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते. खड्डयांमुळे यापूर्वी या मार्गावर उसाचे ट्रक उलटले होते. तसेच छोटे-मोठे अपघात हे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पालिकेकडून खोदकाम...
याबाबत सार्वजिनक बांधकाम विभागाचे अभियंता जांभळे म्हणाले, सदरील रस्ता हा नगरपरिषदेने खोदला आहे. त्यामुळे खड्डे पडले आहेत. याबाबत नगरपालिका प्रशासनास कळवले आहे. मात्र, त्यांनी अद्याप हे काम पूर्ण केले नसल्याचे सांगितले.