सिंचन विहिरींचे ६४ प्रस्ताव धूळ खात, शेतकऱ्यांकडून सातत्याने चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:26 IST2021-02-26T04:26:18+5:302021-02-26T04:26:18+5:30
जळकोट : मग्रारोहयोअंतर्गत तालुक्यातील ४७ गावांतून ११५ प्रस्ताव सिंचन विहिरींचे दाखल झाले हाेते. त्यातील ५० विहिरींना मंजुरी मिळाली आहे. ...

सिंचन विहिरींचे ६४ प्रस्ताव धूळ खात, शेतकऱ्यांकडून सातत्याने चौकशी
जळकोट : मग्रारोहयोअंतर्गत तालुक्यातील ४७ गावांतून ११५ प्रस्ताव सिंचन विहिरींचे दाखल झाले हाेते. त्यातील ५० विहिरींना मंजुरी मिळाली आहे. मात्र, उर्वरित ६४ शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांकडून सातत्याने चौकशी केली जात आहे. दरम्यान, मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे काही मजूर कामाच्या शोधात फिरत असल्याचे दिसून येत आहे.
जळकोट हा डोंगरी, मजुरांचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात खरिपाचे एकच हंगामी पीक घेतले जाते. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, असे शेतकरी रब्बी हंगाम घेतात. तालुक्यात मजुरांची एकूण संख्या २५ हजारपेक्षा जास्त आहे. त्यामुळे येथील मजुरांच्या हाताला नेहमी काम मिळणे अपेक्षित असते. सिंचनाचे क्षेत्र वाढावे आणि त्याचा शेतकऱ्यांना लाभ होऊन आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून शासनाच्या वतीने मग्रारोहयोअंतर्गत सिंचन विहीर खोदकाम केले जाते. त्यामुळे शेतीसाठी सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांना लाभ होतो. याशिवाय, मजुरांच्या हाताला काम मिळते. या विहिरीसाठी शासनाकडून तीन लाखांचे अनुदान देण्यात येते.
यंदा जळकोट तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावलेल्या आहेत. दरम्यान, तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांनी मग्रारोहयोअंतर्गत सिंचन विहिरीसाठी प्रस्ताव दाखल केले होते; परंतु त्यातील केवळ ५० प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. उर्वरित प्रस्ताव अद्यापही जिल्हा परिषदेकडे धूळ खात पडून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
मंजुरी मिळाल्यानंतर कार्यारंभ आदेश...
सदरील शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले आहेत. मंजुरी मिळताच संबंधित पात्र लाभार्थ्यांना तत्काळ विहीर खोदकामाचे कार्यारंभ आदेश देण्यात येतील. लवकरच प्रस्तावास मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- चंद्रहार ढोकणे, गटविकास अधिकारी.
मजुरांचे स्थलांतर थांबवा...
प्रशासनाने तत्काळ सिंचन विहिरींना मंजुरी द्यावी. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम उपलब्ध होईल. त्यातून मजुरांचे स्थलांतर थांबेल, अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले, जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, माजी नगरसेवक शिवानंद देशमुख, खादरभाई लाटवाले, सत्यवान पाटील दळवे, संग्राम पाटील हसुळे, विठ्ठल चव्हाण, अरुण पाटील आगलावे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, रामेश्वर पाटील, आदींनी केली आहे.