धनेगाव बॅरेजेसमध्ये ५१ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:20 IST2021-07-28T04:20:34+5:302021-07-28T04:20:34+5:30

वलांडी : देवणी तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरा नदीवरील निलंगा, देवणी तालुक्याच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या धनेगाव येथील उच्चस्तरीय ...

51% water storage in Dhanegaon barrages | धनेगाव बॅरेजेसमध्ये ५१ टक्के पाणीसाठा

धनेगाव बॅरेजेसमध्ये ५१ टक्के पाणीसाठा

वलांडी : देवणी तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरा नदीवरील निलंगा, देवणी तालुक्याच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या धनेगाव येथील उच्चस्तरीय बॅरेजेसमध्ये यावर्षी सद्यस्थितीत ५१.४५ टक्के पाणीसाठा असून, शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. या प्रकल्पातून कार्यान्वित करण्यात आलेल्या हेळंब व शिऊर या दोन गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून, धनेगाव धरणाची साठवण क्षमता ११.३११ दशलक्ष घनमीटर असून, आजघडीस धरणात ५१.४५ टक्के पाणी उपलब्ध आहे.

पावसाळ्यापूर्वी या धरणात २.९० दशलक्ष घनमीटर पाणी होते. धरणाची उंची ८.५ मीटर असून, धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास गिरकचाळ कोल्हापुरी बंधारा पाण्याखाली जातो, तर हेळंब धनेगाव जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम चालू असल्याने यावर्षी ८ मीटर पाणी थांबविण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली. या प्रकल्पामुळे १४.८६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असून, त्यात धनेगाव, शिरूर, हेळंब, वळसांगवी, शिरोळ, वांजरवाडा, हिसामनगर, गिरकचाळ, जवळगा, टाकळी, वलांडी, बसपूर, बाकली, कवठाळा, घुगी, सांगवी, साकोळ, उजेड, निटूर या गावांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे शून्य पॉईंट डोंगरगाव असून, धरणात गतवर्षीपासून पूर्ण क्षमतेने पाणी थांबविण्यात येत आहे. या धरणात होत असलेल्या पाणीसाठ्यामुळे परिसरातील वलांडी, जवळगा, धनेगाव, टाकळी, हेळंब, माटेगडी या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली आहे. वलांडी महसूल मंडलात गतवर्षी ३५० हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. यावर्षी त्यात वाढ होऊन १ हजार ११५ हेक्‍टरवर उसाची लागवड करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाचे विनायक सूर्यवंशी यांनी दिली. धरण क्षेत्रात पाणी थांबल्याने वलांडी परिमंडलातील विहिरी, बोअरवेलची पाणीपातळी वाढली आहे. धरण क्षेत्रातील भागात मोठा पाऊस झाल्यास धनेगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत होणार आहे.

पुलाचे काम तत्काळ करण्यात यावे...

धनेगाव उच्चस्तरीय बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रातील धनेगाव, हेळंब रस्त्यावरील पुलाचे उर्वरित काम तत्काळ करावे. कामाला बाधा ठरत असलेल्या पाण्याची पातळी कमी करण्याची मागणी धनेगाव व हेळंब ग्रामपंचायतीसह शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

धनेगाव बॅरेजमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे पाण्याच्या पलीकडे असलेल्या जमिनीत शेती कसणे शेतकऱ्यांना जिकरीचे झाले आहे. यासाठी धनेगावकरांना १० किमीचा पल्ला पार करावा लागतो. हेळंब - धनेगाव दळणवळणही बंद होणार आहे. सद्यस्थितीला पाणीपातळी कमी केल्यास उर्वरित पुलाचे काम पूर्ण होऊ शकते, असे धनेगावचे उपसरपंच कुमार पाटील, हेळंबचे सरपंच गोरख सावंत यांनी सांगितले.

Web Title: 51% water storage in Dhanegaon barrages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.