जिल्ह्यात प्राथमिकच्या ५० जागा रिक्त; खासगीचे १६७ शिक्षक अतिरिक्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:21 IST2021-07-27T04:21:05+5:302021-07-27T04:21:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार २७८ शाळा असून, यामधील ५० प्राथमिक शिक्षकांच्या जागा रिक्त ...

जिल्ह्यात प्राथमिकच्या ५० जागा रिक्त; खासगीचे १६७ शिक्षक अतिरिक्त !
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार २७८ शाळा असून, यामधील ५० प्राथमिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. तर खासगी शाळांमधील १६७ शिक्षक अतिरिक्त आहेत. आंतरजिल्हा बदली अंतर्गत ११९ शिक्षकांचे जिल्ह्यात समायोजन करण्यात आल्याने रिक्त असलेल्या जागांची संख्या कमी झाली आहे. दरम्यान, राज्य शासनाकडून शिक्षक भरतीबाबत निर्णय घेण्यात आला असला, तरी प्रत्यक्ष भरतीनंतरच जिल्ह्यातील रिक्त पदे भरले जाण्याची शक्यता आहे.
समायोजनामुळे रिक्त जागा कमी...
आंतरजिल्हा बदली अंतर्गत ११९ शिक्षकांचे समायोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रिक्त शिक्षकांच्या जागा कमी आहेत. सद्यस्थितीत प्राथमिकच्या ५० जागा रिक्त असून, खासगी शाळांमधील १६७ शिक्षक अतिरिक्त आहेत.
- विशाल दशवंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी
रिक्त पदे...
मराठी शाळेतील - ५०
उर्दू शाळेतील - ००
जिल्हा परिषदेच्या १ हजार २७८ शाळा...
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार २७८ शाळा असून, प्रत्येक शाळेतील रिक्त जागांची माहिती शिक्षण विभागाच्यावतीने संकलित करण्यात आली आहे.
दरवर्षी आंतरजिल्हा बदली अंतर्गत शिक्षकांना जिल्ह्यातील शाळांमध्ये नियुक्ती दिली जाते. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी सद्यस्थितीत प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम राबविला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार २७८ शाळांमध्ये जवळपास ५ हजारहून अधिक शिक्षक कार्यरत असून, रिक्त पदांचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नियोजन...
जिल्ह्यात प्राथमिक शाळांमधील ५० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामध्ये सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचाही समावेश आहे. आंतरजिल्हा अंतर्गत ११९ शिक्षकांचे समायोजन झाले आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांना इतर विषय शिकविण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्या, तरी ऑनलाईनद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.
खासगी शाळांमधील १६७ शिक्षक अतिरिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी या शिक्षकांवर जबाबदारी देण्याचे नियोजन केले जात आहे.
शिक्षक संघटनेचे पदाधिकारी म्हणतात..
कोरोनामुळे शिक्षकांवर विविध कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून, शाळांमधून ऑनलाईन अभ्यासक्रम राबविला जात आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने रिक्त पदांची भरती करावी. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी संस्थांमधील अतिरिक्त शिक्षकांना रिक्त जागेवर अध्यापनाची जबाबदारी द्यावी.
- मंगेश सुवर्णकार, जिल्हाध्यक्ष, बहुजन शिक्षक संसद
कोरोनामुळे सध्या ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु आहे. सर्वच शाळांमध्ये याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. शिक्षकही यामध्ये मोठा सहभाग नोंदवत आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी रिक्त असलेल्या जागांवर तत्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच खासगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांवर रिक्त जागांची जबाबदारी तात्पुरती देता येऊ शकते.
- मच्छिंद्र गुरमे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक परिषद