चाकुरातील ४८ टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:20 IST2021-07-28T04:20:52+5:302021-07-28T04:20:52+5:30
तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळांतील विद्यार्थी संख्या १८ हजार २६७ आहे. त्यापैकी ९ हजार ४४७ विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षण ...

चाकुरातील ४८ टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित
तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळांतील विद्यार्थी संख्या १८ हजार २६७ आहे. त्यापैकी ९ हजार ४४७ विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी अँड्रॉइड मोबाइल नाही, तर ग्रामीण भागात नेटची समस्या अभ्यासात व्यत्यय आणत आहेत. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहेत. त्यात ११ हजार ७०८ विद्यार्थी आहेत, तर खाजगीतील पहिली ते सातवीच्या शाळेत ६ हजार ४६१ विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतील ६ हजार ८८ विद्यार्थी, तर खाजगी शाळेतील ३ हजार ३५९ विद्यार्थी अनुपस्थित आहेत. त्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. त्या विद्यार्थ्यांच्या हाती मोबाइल नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांची अनुपस्थिती मात्र चिंताजनक आहे. १५ जुलैपासून शाळा सुरू करण्याचा आदेश शासनाने दिला आहे. शाळांची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंतची आहे. सातवी ते दहावी आणि बारावीपर्यंतच्या शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरू आहेत; परंतु पालकवर्गातून कोरोनाची भीती गेली नसल्याचे चित्र असून, अनेक पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवीत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
मोबाइल नसल्याने अभ्यास कसा करावा...
पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत आहे; परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांकडे मोबाइल नाहीत. त्यामुळे त्यांना शिकवणे कठीण जात आहे. ग्रामीण भागात नेटचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे मोबाइल आहेत त्यांच्याशीही संपर्क योग्यरीत्या होत नाही.
-शारदा अंतुरे, शिक्षिका
विद्यार्थ्यांचे गट करून अभ्यास...
मोबाइल विद्यार्थ्यांच्या हाती नसल्याने गृहभेटीवर भर दिला जात आहे. ५ विद्यार्थ्यांचा गट करून तेथे प्रत्यक्ष जाऊन शिकवणी दिली जाते. कोरोनाची भीती पालकवर्गात अजून कायम आहे. त्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे.
-नंदा नरहरे, शिक्षिका
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे...
शाळा सुरू झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, दप्तर वाटणारे अनेक जण आहेत. ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना काळानुसार मोबाइलची अवश्यकता आहे. सामाजिक भान ठेवून शासनाने विद्यार्थ्यांना मोबाइल द्यावेत.
-नागनाथ पाटील
विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यावर भर...
लसीकरणसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर ४० शिक्षक पाठविण्यात आले आहेत. माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. ऑफलाइन शिकवणीत काही अडचण नाही; परंतु बहुतांश, विद्यार्थ्यांकडे मोबाइल नाही. त्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यास अडसर ठरत आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यावर भर आहे.
-संजय आलमले, गटशिक्षणाधिकारी