कैद्यांनी पिकवलेल्या शेतीतून मिळाला ४५० जणांना दोनवेळच्या जेवणाचा आधार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:13 IST2021-07-12T04:13:41+5:302021-07-12T04:13:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : शहरालगत असलेल्या नांदगाव येथील जिल्हा कारागृहात सध्याला ४५० बंदीवान आहेत. त्यामध्ये ४२६ पुरुष आणि ...

कैद्यांनी पिकवलेल्या शेतीतून मिळाला ४५० जणांना दोनवेळच्या जेवणाचा आधार !
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : शहरालगत असलेल्या नांदगाव येथील जिल्हा कारागृहात सध्याला ४५० बंदीवान आहेत. त्यामध्ये ४२६ पुरुष आणि २४ महिलांचा समावेश आहे. कारागृहातील कैद्यांनी तुरुंगाच्या आवारातील दहा एकर शेती मेहनतीच्या बळावर फुलवली. याच शेतीने ४५० जणांना दोनवेळच्या भाकरीचा आधार दिला आहे.
दहा वर्षांपूर्वी लातूर येथे स्वतंत्र जिल्हा कारागृह अस्तित्वात आले. यापूर्वी उस्मानाबाद कारागृहात लातूर जिल्ह्यातील आरोपींना ठेवावे लागत होते. आता लातूरला कारागृह झाल्याने उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या कारागृहांची गरज भासत नाही. लातूर कारागृहाला दहा एकरची शेती आहे. यामध्ये कैद्यांच्या मेहनतीतून भोपळा, वांगी, भेंडी, टोमॅटो, दुधी भोपळा, पालक, कोथिंबीर, शेपू, मेथी असा भाजीपाला घेण्यात येतो. यातूनच कारागृहातील बंदीवानांना दोनवेळच्या भाकरीचा आधार मिळत आहे.
काय बनवले जाते
भाजीपाला : कारागृहातील दहा एकरावरील शेतीत दरवर्षी सोयाबीनबरोबर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते.
शिवणकाम : कारागृहातील कैद्यांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या माध्यमातून भविष्यात विविध उत्पादने केली जाणार आहेत.
मार्केटिंग : कारागृहातील शेतीत पिकवलेला भाजीपाला लातूरच्या बाजारपेठेत विक्री करून उत्पादन मिळविण्यासाठी मार्केटिंग शिकवले जाते.
कौशल्य : कारागृहातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे.
मास्क : कोरोना काळात शिवणकला आणि प्रशिक्षण बंद पडले. त्यामुळे मास्कची निर्मिती करता आली नाही.
कोरोना काळात शेती उत्पादन घटले
लातूरच्या कारागृहात असलेल्या दहा एकरावर कोरोनापूर्वी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात होते. मात्र, कोरोना काळात अनेक कैद्यांना पॅरोल रजेवर सोडण्यात आल्याने संख्या कमी झाली. त्यातून शेतीचे नियोजन कोलमडले. मात्र, आहे त्या कैद्यांच्या मेहनतीतून शेती फुलली आहे. याच भाजीपाल्यावर दोनवेळच्या जेवणाचे नियोजन करण्यात येत आहे.
अनेकजण पॅरोलवर बाहेर
लातूर कारागृहातील एकूण ४५० कैद्यांपैकी अनेकजण कोरोना काळात पॅरोल रजेवर बाहेर पडले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कारागृह प्रशासनाने नियोजन केले होते.
काळजी म्हणून पॅरोलचा लाभ कैद्यांना देता आला. आता पुन्हा हे कैदी परतले आहेत. त्यांच्या मेहनतीतून शेतात भाजीपाला पिकवला जात आहे.
कारागृहाला शेती उत्पादनाचा आधार
लातूर येथील जिल्हा कारागृहाकडे एकूण दहा एकरची शेती आहे. यामध्ये भाजीपाल्यासह सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. कैद्यांसाठी बनविण्यात येणाऱ्या भोजनासाठी भाजीपाला लागतो. आता कारागृहातील शेतीतून तो मिळत आहे. अधिकचा भाजीपाला लातूरच्या भाजी मंडईत विकला जात आहे. - राहुल झुटाळे, कारागृह अधीक्षक