ओटीपी चेक करताना निवृत्त प्राध्यापकाचे एटीम कार्ड बदलले; काही वेळात ४० हजार गायब
By हरी मोकाशे | Updated: September 19, 2022 15:54 IST2022-09-19T15:53:12+5:302022-09-19T15:54:07+5:30
मोबाईलमध्ये ओटीपी पाहत असताना बदलले एटीएम कार्ड

ओटीपी चेक करताना निवृत्त प्राध्यापकाचे एटीम कार्ड बदलले; काही वेळात ४० हजार गायब
उदगीर ( जिल्हा लातूर) : येथील शहर पोलीस स्टेशनच्यासमोर असलेल्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका निवृत्त प्राध्यापकाच्या एटीएम कार्डाची अदलाबदल करून त्या प्राध्यापकाच्या खात्यातून ४० हजार रुपये चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत उदगीरच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका संशयीतास चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उदगीर येथील बिदर रोडवरील होळकर गार्डनच्या परीसरात राहणारे निवृत्त प्राध्यापक महादेव बसवण्णा गंदीगुडे हे १२ सप्टेंबर रोजी शहर पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रामधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांचाजवळील एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकले व मोबाईल आलेला ओटीपी पाहतेवेळी पाठीमागे थांबलेल्या अज्ञात युवकाने मशीनमधील कार्ड काढून दुसरेच एटीम कार्ड मशीनमध्ये टाकले.
पासवर्ड दाबून सुध्दा रक्कम येत नसल्याने त्यांनी पुन्हा पासवर्ड दाबला. परंतु वारंवार चुकीच्या संदेश म्हणून एटीएमच्या मशीनवर दर्शनी भागावर दाखवत असल्याने ते त्या मशीनमधील असलेले कार्ड घेऊन बाहेर पडले.
नंतर काही वेळात त्यांच्या खात्यातून रक्कम काढून घेतल्याचे मोबाईलवर एसएमएस आला. त्यामुळे ते चौकशी करण्यासाठी बँकेकडे परत फिरले. ते बँकेत येईपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांच्या खात्यातून ४० हजार रुपये अज्ञात चोरट्याने काढून घेतले होते .ही बाब त्यांनी बँकेत जाऊन बँकेतील कर्मचाऱ्यांच्या नजरेस आणून दिली. त्यानंतर बँकेने त्यांचे खाते लॉक केले. याबाबत त्यांनी रविवारी उदगीर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शहर पोलिसांनी तेलंगणा येथील एका युवकास चौकशीसाठी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.