आरटीईच्या १७४० जागांसाठी ४ हजार २४ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:16 IST2021-04-03T04:16:14+5:302021-04-03T04:16:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. २०२१-२२ या ...

आरटीईच्या १७४० जागांसाठी ४ हजार २४ अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी ३० मार्च ही अर्जांसाठीची अंतिम तारीख होती. जिल्ह्यात १७४० जागांसाठी ४०२४ अर्ज आले असून, राज्यस्तरावरून निघणाऱ्या सोडतीकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
कोरोनामुळे अनेकांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी अर्ज आले आहेत. यामध्ये अहमदपूर तालुक्यातून १५०, औसा- १३७, चाकूर- ९२, देवणी- ५८, जळकोट- १७, लातूर- १७५९, लातूर युआरसी- १२७६, लातूर युआरसी २ - ८५२, निलंगा- १९७, रेणापूर- ५७, शिरूर अनंतपाळ २४ तर उदगीर तालुक्यातील ४०५ अर्जांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील २३८ शाळांनी शिक्षण विभागाकडे २५ टक्के मोफत प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये लातूर तालुक्यातील सर्वाधिक ५४ शाळांचा समावेश आहे. राज्यस्तरावरील सोडत लवकरच जाहीर होणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संदेश पाठविले जाणार आहेत. त्यानंतर निवड झालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. यंदाही शाळास्तरावर कागदपत्रे पडताळणीसाठी समित्या स्थापन केल्या जाणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
२३८ शाळांची नोंदणी
शिक्षण विभागाकडे २३८ शाळांनी नोंदणी केली असून, यामध्ये अहमदपूर तालुक्यातील १६, औसा २०, चाकूर १४, देवणी ८, जळकोट ४, लातूर ५४, लातूर युआरसी १ - १५, लातूर युआरसी २- ३७, निलंगा २८, रेणापूर ८, शिरूर अनंतपाळ २ तर उदगीर तालुक्यातील ३२ शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १७४० जागा भरल्या जाणार आहेत.
शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यातून १७४० जागांसाठी ४०२४ अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यस्तरावरून लवकरच सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या शाळेत प्रवेश दिले जातील. या प्रक्रियेसाठी २३८ शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली आहे. प्रवेश प्रक्रियेची तयारी केली जात आहे. - विशाल दशवंत,
प्राथमिक शिक्षणाधिकारी
मोफत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरला आहे. राज्यस्तरावर एकच सोडत निघणार असून, त्यानंतर प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश दिले जाणार आहेत. दरवर्षी प्रतीक्षा यादी उशिरा जाहीर होते. तोपर्यंत इतर शाळेतील प्रवेश बंद होतात. त्यामुळे शिक्षण विभागाने पहिल्या सोडतीनंतर प्रतीक्षा यादी लवकर जाहीर करावी.
- ऋषिकेश महामुनी, पालक
लाॅटरी जाहीर झाल्यानंतर कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पुरेसा अवधी देण्याची गरज आहे. पूर्वी तालुकास्तरावर कागदपत्रांची पडताळणी केली जात होती. आता शाळास्तरावर कागदपत्रे तपासली जात आहेत. त्यामुळे तात्काळ प्रवेश होत आहेत. सर्वांनाच प्रवेश मिळणे अशक्य असल्याने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी द्यावी.
- शंकर भोसले, पालक
आरटीईची प्रवेशप्रक्रिया पूर्ण होण्यासाठी भरपूर कालावधी लागतो. तोपर्यंत इतर खाजगी शाळांत प्रवेश बंद होतात. त्यामुळे पालकांची धावपळ होते. आरटीईची प्रक्रिया वेळापत्रकानुसार पार पाडण्यात यावी. त्यामुळे पालकांची गैरसोय होणार नाही. प्रतीक्षा यादी जाहीर होण्यामधील अंतर कमीत कमी चार ते पाच दिवसांचे पाहिजे.
- प्रमोद शिनगारे, पालक
तालुका शाळा जागा अर्ज
अहमदपूर १६ १०१ १५०
औसा २० ८९ १३७
चाकूर १४ ७३ ९२
देवणी ०८ ३९ ५८
जळकोट ०४ ०५ १७
लातूर ५४ ५१९ १७५९
लातूर-१ १५ १५१ २७६
लातूर-२ ३७ ३४७ ८५२
निलंगा २८ १५८ १९७
रेणापूर ०८ ३२ ५७
शिरूर अ. ०२ १२ २४
उदगीर ३२ २१४ ४०५