जिल्ह्यातील 4 लाख विद्यार्थी विनापरीक्षा झाले उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:17 IST2021-04-05T04:17:41+5:302021-04-05T04:17:41+5:30
लातूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार ...

जिल्ह्यातील 4 लाख विद्यार्थी विनापरीक्षा झाले उत्तीर्ण
लातूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. त्याचा जिल्ह्यातील ३ लाख ९४ हजार ४६४ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
गेल्या वर्षीपासून राज्यात कोरोनाचे संकट सुरू आहे. गेल्या वर्षीही ऐन परीक्षा तोंडावर आल्या असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. दरम्यान, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शिक्षण विभागाकडून ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला. वर्षभरात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळांची घंटीच वाजली नाही. साधारणत: चार महिन्यांपासून पुढील इयत्तांचे वर्ग भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे परीक्षा कशा होणार, अशी विद्यार्थ्यांसह पालकांना धास्तीच होती. याशिवाय, सध्या कोरोनाचा आलेख उंचावला असल्याने शाळांमध्ये परीक्षा घेणे कठीण झाले होते. शिक्षणमंत्र्यांच्या परीक्षेविना पास धोरणाचा निर्णय चांगला असल्याचे पालक म्हणत असले तरी मुले लिखाणाच्या सरावापासून दुरावत आहेत, अशी चिंताही व्यक्त करीत आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे वर्षभर वर्ग भरले नाहीत. ऑनलाइन शिक्षण असले तरी त्याचा योग्य परिणाम विद्यार्थ्यांवर अपेक्षित प्रमाणात दिसून येत नव्हता. शिक्षणासाठी सतत मोबाइल वापरामुळे डोळ्यावर ताण येऊन परिणाम होत होता. त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र, लिखाणाचा सराव बंद झाला आहे.
- प्रमोद गाडेकर
कोरोनाच्या संकटाचा सर्वांवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू होते; परंतु ग्रामीण भागातील शंभर टक्के मुले या प्रवाहात नव्हती. जिल्हा परिषदेने कोविड कॅप्टनच्या माध्यमातून शिक्षणावर भर दिला होता. त्याचा काही प्रमाणात लाभ झाला असला तरी परीक्षा न घेणे योग्यच आहे.
- नंदकुमार थडकर
ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावले नाहीत. कमी-जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांचे अध्ययन झाले आहे. शिक्षणमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्य असला तरी प्रश्नपत्रिका घरी देऊन उत्तरपत्रिका घरीच सोडवून घेतली असता विद्यार्थ्यांना कितपत समजले आहे, याची माहिती मिळू शकली असती. मात्र, परीक्षा घेतली जाणार नसल्याने विद्यार्थ्यांच्या लिखाणाची सवय बंद झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे शाळाच नसल्याने मुले टीव्ही, मोबाइलवर व्यस्त राहत आहेत. त्यामुळे ती काही प्रमाणात आळशी बनत आहेत. परीक्षा असली असती तर काही प्रमाणात विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असता.
- नानासाहेब देशमुख
ग्रामीण भागातील विशेषत: अशिक्षित कुटुंबातील इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पुढील अभ्यास झेपण्याची कमी शक्यता आहे. त्यामुळे गळती होण्याची शक्यता आहे, तसेच विद्यार्थ्यांचे शाळेकडे दुर्लक्ष होण्याची भीती आहे.
- सतीश सातपुते