जिल्ह्यात दररोज होतोय ३०० पीपीई किटचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:19 IST2021-04-02T04:19:06+5:302021-04-02T04:19:06+5:30
लातूर : कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने पीपीई किटचाही वापर वाढला आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या एका कोविड रुग्णालयात ...

जिल्ह्यात दररोज होतोय ३०० पीपीई किटचा वापर
लातूर : कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने पीपीई किटचाही वापर वाढला आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या एका कोविड रुग्णालयात रोज दीडशे पीपीई किट लागत आहेत; तर उपजिल्हा रुग्णालयात आणि ग्रामीण रुग्णालयांत मिळून दीडशे अशी एकूण ३०० पीपीई किट लागत आहेत. दरम्यान, ड्यूटी कालावधीत दिवसभर किट वापरण्याला आरोग्य कर्मचारी वैतागले असून, किट नको रे बाबा म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या औषधी भांडार कक्षाकडून ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयांना पीपीई किटचा पुरवठा केला जातो; तर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील कोविड रुग्णालयात त्यांच्या स्तरावर किट घेतले जातात. दोन्हीकडे मिळून रोज ३०० किट लागत आहेत. जे डाॅक्टर व कर्मचारी या किटचा वापर करतात, ते पुरते कंटाळले असून, अनेकजण पीपीई किट घालण्यास आळस करीत असल्याने त्यांना पीपीई किट वापराबद्दल सुरक्षेसाठी सूचित करण्यात आले आहे.
पीपीई किट वापरासाठी सुलभ असावेत म्हणून खरेदी करताना पीपीई किटचा डेमो करूनच खरेदी केली जाते. केंद्रीय स्तरावर असलेल्या एजन्सीकडून पीपीई किटची खरेदी होते. त्यामुळे आता नव्याने आलेले पीपीई किट सुरक्षित आहेत आणि वापरासही सुलभ आहेत.
नव्याने आलेले पीपीई किट वापरास सुलभ असले तरी ते दिवसभर घालून बसणे कंटाळवाणे आहे. कोरोना परवडला असे म्हणण्याची वेळ येते. सध्या उन्हाळा असल्यामुळे पीपीई किट घातल्यानंतर अंगातून घामाच्या धारा सुटतात. रुग्णालयात एसी असतानासुद्धा ही परिस्थिती आहे.
कोरोनाच्या प्रारंभाच्या काळामध्ये पीपीई किट वापरताना त्रास होत होता. मात्र आता सवय झाली आहे. त्यामुळे तेवढा त्रास नाही. शिवाय, नवीन आलेले पीपीई किट त्या पद्धतीने बनविण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता काही वाटत नाही.