पशुधनाच्या दरात ३० टक्क्यांनी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:15 IST2021-06-01T04:15:26+5:302021-06-01T04:15:26+5:30
चापोली : कोरोनामुळे दुधाची मागणी घटल्याने दूध उत्पादक संकटात सापडले आहेत, तर पशुखाद्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे पशुधन सांभाळणे ...

पशुधनाच्या दरात ३० टक्क्यांनी घट
चापोली : कोरोनामुळे दुधाची मागणी घटल्याने दूध उत्पादक संकटात सापडले आहेत, तर पशुखाद्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे पशुधन सांभाळणे कठीण झाले आहे. त्याचा परिणाम गाई-म्हशींच्या खरेदी-विक्रीवर झाला आहे. बाजार बंद असल्याने खरेदीसाठी ग्राहक मिळत नाहीत. परिणामी, दर ३० ते ४० टक्क्यांनी गडगडले आहेत.
कोरोनामुळे पशुधन बाजार बंद आहे. त्यामुळे खरेदी-विक्री मंदावली आहे. पंढरपुरी, नागपुरी, मुरा, मेहसाणा जातीच्या म्हशींचे दर लाखापर्यंत तर स्थानिक म्हैशींचे दर ५० ते ७० हजारांपर्यंत होते. पण, सध्या भाव घसरले आहेत. एरव्ही चांगली गाय ५० ते ६० हजारांपर्यंत खरेदी केली जात होती. मात्र, तीन-चार महिन्यांपासून ३५ ते ४० हजारांपर्यंत दर खाली आले आहेत. दुधाला स्थिर दर नसल्याने पशुधन सांभाळणे कठीण होत आहे. त्यामुळे शेतकरी पशुधन विक्री करीत आहेत. चापोली, चाकूर, नळेगाव, हाळी हंडरगुळी परिसरात मोठ्या प्रमाणात गाईंचे संगोपन केले जाते. त्यामुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह दूध व्यवसायावर अवलंबून आहे. मंदीमुळे या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
बाजार बंदचा फटका...
जिल्ह्यात हाळी हंडरगुळीचा पशुधन बाजार सर्वांत मोठा आहे. त्यापाठोपाठ नळेगाव, मुरुडचा बाजार आहे. मात्र, जिल्ह्यातील शेतकरी पशुधन खरेदी-विक्रीसाठी जांब, लोहा, नरसी, नायगाव (नांदेड), बार्शी (सोलापूर), भूम, वालवड (उस्मानाबाद) येथे जातात. सध्या कोरोनामुळे सर्व बाजार बंद असल्याने फटका बसत आहे.
पशुखाद्याच्या दरात वाढ...
पशुखाद्यांचे भाव वाढल्याने सध्या दुधाला मिळणारा भाव परवडणारा नाही. सरकी, शेंगदाणा पेंड, मक्याचा भरडा, ओली व वाळलेली वैरण, जनावरे आजारी पडल्यावर औषधोपचारासाठीच्या खर्चामुळे पशुपालक शेतकरी तोट्यात आहेत.
पशुपालकांना मदतीची गरज...
कोविडमुळे सलग दुसऱ्याही वर्षी दुग्ध व्यवसाय करणारे अडचणीत आहेत. त्यातच पशुखाद्यांचे भाव वाढल्याने सध्या दुधाला मिळणारा दर हा परवडणारा नाही. त्यामुळे सरकारने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे, असे येथील पशुपालक धनंजय बालवाड म्हणाले.