२६२१ शेतकऱ्यांकडे अडकली ३६ कोटींची थकबाकी।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:18 IST2021-02-15T04:18:17+5:302021-02-15T04:18:17+5:30
बेलकुंड : महावितरण कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरातील १६ गावांमधील तब्बल २ हजार ६२१ शेतकऱ्यांकडे एकूण ३५ कोटी ८८ लाखांची ...

२६२१ शेतकऱ्यांकडे अडकली ३६ कोटींची थकबाकी।
बेलकुंड : महावितरण कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरातील १६ गावांमधील तब्बल २ हजार ६२१ शेतकऱ्यांकडे एकूण ३५ कोटी ८८ लाखांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणची पथके गावागावात दाखल झाली आहेत.
वीजबिलाच्या वसुलीसाठी वीज कर्मचारी गावोगावी जात शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजबिलाची थकबाकी भरण्याबाबत सूचना करत आहेत. यावेळी ‘कृषी वीज धोरण २०२०’ या नवीन योजनेची माहितीही देत आहेत. त्याचबराेबर शेतकऱ्यांनी पूर्ण थकबाकी भरावी, असे आवाहनही केले जात आहे.
बेलकुंड परिसरात यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावलेला असताना, कोरोनाचा फटका बसल्याने शेतीमालाचे बाजारभाव घसरले आहेत. यातून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अशास्थितीत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात शेतात गहू, ज्वारी, हरभरा, ऊसाची लागवड केली आहे. सध्या उपलब्ध पाण्यावर रब्बीची पिके बहरत आहेत. असे असताना महावितरण कंपनीकडून शेतातील कृषिपंपांच्या वीजबिलांची वसुली मोहीम राबवली जात आहे. बिलाची थकबाकी राहिल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल, असे सांगितले जात आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास पाण्याअभावी शेतातील पिके वाळण्याची भीती व्यक्त हाेत आहे.
महावितरणकडून सध्या थकीत वीजबिल वसुलीसाठी ‘कृषी वीज धोरण २०२०’ ही योजना राबवली जात आहे. या योजनेत सप्टेंबर २०१५ ते आजपर्यंतच्या एकूण थकबाकीत शेतकऱ्यांनी एकरकमी अर्धी रक्कम जमा केली तर शेतकऱ्यांना जवळपास ५० ते ६० टक्के सवलत मिळणार आहे. ही योजना तीन टप्प्यात सुरु राहणार असून, दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांनी पैसे भरले तर त्यांना ३० टक्के आणि तिसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांनी पैसे भरले तर त्यांना २० टक्के सवलत मिळणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
वसुलीसाठी गावागावात बैठक...
शेतकऱ्यांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीचे पथक सध्या बेलकुंड परिसरातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बैठका घेत आहे. या बैठकीत कंपनीच्या योजनांची माहिती देत वीजबिलाच्या अर्धी रक्कम एकरकमी भरल्यास पूर्ण वीजबिल माफ होणार, याबाबत माहिती दिली जात आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेऊन सहकार्य करावे अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे महावितरणचे सहायक अभियंता अमित शृंगारे यांनी सांगितले.