औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील तेरणा नदीवरील साेनखेड बंधाऱ्याचे काम अर्धवट राहिल्याने गतवर्षी पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. जलसंपदा विभागाने वाहून गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर २५ हजार घनमीटर माती भरून देऊन बंधाऱ्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे यंदा प्रकल्पात पाणीसाठा हाेणार असून, परिसरातील २०९ हेक्टर जमीन बारमाही सिंचनाखाली येणार आहे.
निलंगा तालुक्यातील साेनखेड येथील तेरणा नदीवर काेल्हापुरी बंधारा आहे. या बंधाऱ्याचे उच्चस्तरीय बंधाऱ्यात रूपांतरित करण्याचे काम गतवर्षी अर्धवट राहिले होते. प्रशासनाने जुन्या काेल्हापुरी बंधाऱ्याची दारे टाकून पाणी अडविले हाेते; पण परतीच्या पावसाच्या कालावधीत अतिवृष्टी हाेऊन तेरणा नदीला पूर आला होता. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील निम्न तेरणा प्रकल्पातील पाणी नदीपात्रात साेडण्यात आल्याने नदीला पूर आला. साेनखेड बंधाऱ्याची एक बाजूची वाळू व शेजारील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीतून नदीने पात्र तयार करून वाहती झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या हाेत्या.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे काम...
यावर्षी पुन्हा पुरामुळे नुकसान हाेऊ नये म्हणून जलसिंचन विभागाने या अर्धवट बंधाऱ्याचे काम हाती घेऊन पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले. पुराच्या पाण्यामुळे २५० मीटर लांब, ३० मीटर रुंद व ६ मीटर खाेल माती वाहून गेली होती. या क्षेत्रात जलसंपदा यांत्रिकी विभागाच्या चार जीसीबी, सहा टिप्पर, एक डाेझरच्या साहाय्याने २५ हजार घनमीटर मातीकाम जवळपास एक महिना यंत्रांच्या साहाय्याने पूर्ण करण्यात आले आहे. यात एक हेक्टर जमीन क्षेत्र तयार झाले आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या सूचनेप्रमाणे पूरबाधित शेतकऱ्यांच्या जमिनी पूर्ववत करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
बंधाऱ्यात बारमाही १.०४४ दलघमी पाणी...
सोनखेड बंधाऱ्यात बारमाही १.०४४ दलघमी पाणीसाठा हाेणार असल्याने साेनखेड, बाेरसुरी, चांदाेरी, येळनूर, गुजंरगा या गावातील शेतकऱ्यांच्या २०९ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ हाेणार आहे. हे काम जलसिंचन विभागाचे मुख्य अभियंता दिलीप ताेवर, अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता राेहित जगताप यांच्या नियाेजनाखाली उपअभियंता उदय भाेसले, उपअभियंता आर. के. पाटील, उपअभियंता एस. आर. मुळे, याेगेश बिराजदार, एस. एस. गरड यांनी केले आहे.