औराद शहाजानी (जि.लातूर) : मांजरा तेरणा नदीच्या पुराचे पाणी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात मेहकर हद्दीतील नारदासंगम शिवारात मोठ्या प्रमाणात आले आहे. याठिकाणी मागील १४ दिवसांपासून २० माकडे झाडावरती अडकली आहे. त्यांच्या मदतीसाठी मंगळवारी एनडीआरएफचे पथक आले. मात्र, माकडं जवळ येत नसल्याने अखेर कढईत त्यांना आठ दिवस पुरेल इतके खाद्यपदार्थ ठेवून पथक परतले.
१४ दिवसांपासून पुरात अडकलेल्या २० माकडांना बाहेर काढण्यासाठी मेहकर येथील बिदर भाजपा समन्वयक व्यंकट लाळे, सरपंच सत्यवान कांबळे यांनी भालकीचे तहसिलदार मल्लिकार्जुन, तालुका गटविकास अधिकारी सूर्यकांत बिरादार यांना सदर घटना सांगितल्यानंतर बिदर येथून एनडीआरएफचे ९ जणांचे पथक आले. या माकडांना पुराच्या पाण्यातुन काढण्यासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न करत बोट घेऊन पुराच्या पाण्यात झाडाजवळ गेले. पण माकडे काही जवळ येत नव्हते. शेवटी एक लोखंडी कढई घेऊन त्यात त्यांना खाण्यासाठी भाकरी, बिस्किट, केळी टाकण्यात आली. ते कढईत उतरले पण दोरी ओढताच पुन्हा झाडावर चढले, शेवटी प्रशासनाने या वानरांना आठ दिवस पुरेल इतके बिस्किट, भाकर, मक्याची कनस, जांब हे अन्नपदार्थ झाडाच्या बांधावर खपटामध्ये ठेवून सायंकाळी परत आले.