विनामास्क नागरिकांकडून २ लाख १० हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:19 IST2021-04-11T04:19:19+5:302021-04-11T04:19:19+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने तो रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीस कडक निर्बंध लागू केले. दरम्यान, कोरोनाबाधितांचा आलेख वाढतच असल्याने ...

विनामास्क नागरिकांकडून २ लाख १० हजारांचा दंड वसूल
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने तो रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीस कडक निर्बंध लागू केले. दरम्यान, कोरोनाबाधितांचा आलेख वाढतच असल्याने शासनाने ब्रेक द चेन नियमावलीअंतर्गत अत्यावश्यक सेवेतील व हातावर पोट असलेल्यांची दुकाने सुरू ठेवण्याचा आदेश लागू केला. तसेच प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्स राखावा. गर्दीत जाणे टाळावे, अशा सूचना वारंवार करण्यात येत आहेत.
शहरात या कालावधीत शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. गेल्या १० दिवसांच्या कालावधीत शहरात विनामास्क फिरणाऱ्या ५२० जणांवर दंड आकारण्यात आला आहे. त्यांच्याकडून २ लाख १० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कार्यवाही उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, प्रभारी उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे कर्मचारी नागनाथ उपरबावडे, शिवराज राठोड, विशाल ससाणे, वैभव कदम यांच्या पथकाने केली आहे.
२५ आस्थापनांवर कार्यवाही...
प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कार्यवाहीवर भर देण्यात आला आहे. एप्रिलपासून आतापर्यंत २५ आस्थापनांवर कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच एका मंगल कार्यालयासही १० हजारांचा दंड आकारण्यात आला. दरम्यान, होम क्वॉरंटाइन असलेल्यांपैकी एकाने नियमांचे उल्लंघन केल्याने त्याच्याकडून १० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
नागरिकांत जनजागृती वाढली...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या नियमांचे शहरासह तालुक्यात पालन केले जात आहे. त्यामुळे नागरिकांत जनजागृती वाढली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच चेहऱ्यास मास्क लावावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.