लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदपूर : लोकसहभाग व शिक्षकांच्या मदतीने ‘बाला उपक्रम’ अभियानाने तालुक्यात विधायक स्पर्धा निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून बाला उपक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. अहमदपूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १७२ प्राथमिक शाळा असून, यापैकी १५० शाळांमध्ये रंगरंगोटीसह परिसर स्वच्छता केली आहे. शिक्षक व पालकांच्या समन्वयातून १९ लाख ७१ हजारांची लोकवर्गणी जमा झाली आहे.
कोरोनाच्या सावटामुळे शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची खटपट सुरू आहे. कोरोनाचे संकट दूर व्हावे व शाळा पुन्हा विद्यार्थ्यांनी भराव्यात. प्रार्थना, पाठ्यपुस्तकातील धडे, गणितांची आकडेमोड करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक सज्ज आहेत. बाला उपक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनाच वाटले शाळेत मुले नाहीत, शिक्षक संख्या कमी आहे. पालकांचे शाळेकडे येणे-जाणे बंद झाले आहे. अशा परिस्थितीत हे कसे काय शक्य आहे? लोकसहभागासह, शिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद वाढण्यास सुरुवात झाली. संपूर्ण तालुक्यात शाळा स्वच्छता, रंगरंगोटीची चळवळ सुरू झाली. हळूहळू याचे रूपांतर स्पर्धेमध्ये झाले. मग कोणी सांगतोय म्हणून करावे, यापेक्षा शिक्षकांनाच वाटायला लागले की आपली शाळा स्वच्छ, सुंदर व्हायला हवी.
संपूर्ण तालुक्यातील शिक्षक-पालक, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती या अभियानांतर्गत कामाला लागले. शाळेच्या आवारातील वृक्षारोपण, शाळा रंगरंगोटी, वर्ग स्वच्छता, मैदान सपाटीकरण, स्वच्छतागृहांची सोय, पाण्याची सोय करण्यात आली. तसेच बाला उपक्रमांतर्गत शाळेच्या संरक्षक भिंतीवर रंगरंगोटी करत या भिंतीवर ग्रामस्वच्छता, प्रदूषणमुक्त गाव, पर्यावरणमुक्त गाव, जल पुनर्भरण असे महत्त्वाचे मुद्दे सादर करत यासारख्या गोष्टी शाळेत पुन्हा नव्याने दिसू लागल्या. कोरोनाच्या सावटामुळे आलेली मरगळ दूर होत आहे.
विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत होणार...
विद्यार्थ्यांना आनंदाने व स्वतःच्या गतीने शिकण्यास मदत होणार आहे. तसेच यातील काही उपक्रम असे आहेत की, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणाचेही महत्त्व समजणार आहे. त्याचबरोबर विविध कौशल्य विकासासाठी हे उपक्रम महत्त्वाचे आहेत. तालुक्यातील अनेक शाळांमध्ये चांगल्याप्रकारे काम झाले आहे. नवनवीन संकल्पनांसह शाळेचा परिसर सुशोभित करण्यात आलेला आहे.
- बबनराव ढोकाडे, गटशिक्षणधिकारी, पंचायत समिती