अहमदपूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने एसटी महामंडळाच्या आंतरजिल्हा व लांब पल्ल्याच्या बसेस १९ दिवसांपासून जागेवरच आहेत. या कालावधीत अहमदपूर आगाराच्या बसेसच्या ५७९ फेऱ्या झाल्या असून, त्यातून केवळ ११ लाख ४३ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. बससेवा ठप्प झाल्याने आगारास १ कोटी ४० लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडवावे लागले आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्य शासनाने कडक नियम लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी बससेवा सुरु असली तरी ती अल्प प्रमाणात आहे. परिणामी, जवळपास १९ दिवसांपासून बसेस बंद आहेत. शासनाने जिल्ह्याअंतर्गत बससेवा सुरु करण्यास मुभा दिली असली तरी प्रवासी मिळत नसल्याने येथील आगारातून केवळ लातूर आणि उदगीरसाठी बस सुरु आहे.
सध्या जिल्हा ते तालुका अशी बससेवा सुरु आहे. त्यानुसार अहमदपूरहून लातूरसाठी ७, उदगीरसाठी ५ अशा एकूण १२ बसेस सुरु केल्या आहेत. प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. दररोज ४० फेऱ्या होत आहेत. १० एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत अहमदपूर आगारातील बसेसच्या ५७९ फेऱ्या झाल्या असून, त्यातून केवळ ११ लाख ४३ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. आगाराचे १ कोटी ४० लाख उत्पन्न बुडाले आहे.
दररोज धावतात १२ बसेस...
अहमदपूर येथील आगारात ७८ बसेस आहेत. चालक- वाहकांसह अन्य कर्मचारी असे एकूण ४९० कर्मचारी आहेत. सध्या दररोज लातूरसाठी ७, उदगीरला ५ बसेस धावत आहेत. उर्वरित बस आगारातच उभ्या आहेत. सध्या सुरु असलेल्या बसेस रिकाम्या धावत आहेत. प्रवासी मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. लांब पल्ल्याच्या बसेस बंद असल्याने आगारास जवळपास १ कोटी ४० लाखांचा फटका बसला आहे.
दुचाकींचा वापर वाढला...
संचारबंदी सुरू झाल्यापासून ग्रामीण भागात एकही बस धावली नाही. शिवाय, खासगी प्रवासी वाहतूकही बंद आहे. आता खरीप हंगामासाठी आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. तसेच विविध शासकीय कामानिमित्ताने तालुकाच्या गावी जावे लागते. मात्र, बस नसल्याने अडचणी येत आहेत. बहुतांश वेळा दुचाकीचा वापर करावा लागत आहे, असे ग्रामीण भागातील प्रवाशांनी सांगितले.
राज्याअंतर्गत व आंतरराज्य, आंतरजिल्हा वाहतूक व्यवस्था बंद आहे. पूर्वी येथून दररोज २५० बसेस धावत होत्या. महामंडळाने आगारातील २१० फेऱ्या रद्द केल्या आहेत. लांब, मध्यम पल्ल्यासह ग्रामीण भागातील सर्व बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकात पूर्णपणे शुकशुकाट दिसून येत आहे, असे आगारप्रमुख एस. जी. सोनवणे म्हणाले.