१७ हजार क्विंटल सोयाबीन बियाणांची शिरूर अनंतपाळसाठी गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:36+5:302021-06-04T04:16:36+5:30
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यात खरीप हंगामासाठी १७ हजार ६२५ क्विंटल सोयाबीन बियाणांची गरज आहे. बियाणांच्या उपलब्धतेसाठी तालुका ...

१७ हजार क्विंटल सोयाबीन बियाणांची शिरूर अनंतपाळसाठी गरज
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यात खरीप हंगामासाठी १७ हजार ६२५ क्विंटल सोयाबीन बियाणांची गरज आहे. बियाणांच्या उपलब्धतेसाठी तालुका कृषी कार्यालयाने त्रिस्तरीय कृती आराखडा तयार केला आहे. त्यात शेतकऱ्यांकडील, महाबीज आणि वखार महामंडळाकडून उपलब्ध होणारे तसेच खाजगी कंपन्याचे बियाणे राहणार आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात २८ हजार ५०० हेक्टर्स लागवडीस योग्य क्षेत्र आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी सोयाबीनचा पेरा करतात. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयाकडून २३ हजार ८२५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार सोयाबीन बियाणांची उपलब्धता होणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषी विभागाने तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, मंडळ अधिकारी सदाशिव गाढवे, कृषी अधिकारी शिवप्रसाद वलांडे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्रिस्तरीय कृती आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांकडे सर्वाधिक म्हणजे १३ हजार ५८८ क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे सर्वेक्षण कृषी विभाकडून करण्यात आले. महाबीज आणि वखार महामंडळाकडून १ हजार क्विंटल बियाणे मागविण्यात आले आहे. खाजगी कंपन्यांकडून जवळपास १ हजार ९०० क्विंटल बियाणे उपलब्ध होत आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरणीसाठी १७ हजार ६२५ क्विंटल बियाणांची गरज आहे. सध्या १७ हजार ७३५ क्विंटल बियाणांची उपलब्धता झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई गडबड न करता योग्य बियाणांची निवड करावी, असे आवाहन तालुका कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
खरीपाच्या पेऱ्याचे नियोजन...
खरीप हंगामासाठी २८ हजार ५०० हेक्टर्स लागवडीस योग्य क्षेत्र असून, त्यापैकी २३ हजार ८२५ हेक्टरवर सोयाबीन, ३ हजार ८०० हेक्टरवर तूर, १८८ हेक्टरवर हायब्रीड ज्वारी, ३०३ हेक्टरवर उडीद तर ३२५ हेक्टरवर मुग असा पेरा होण्याचा अंदाज आहे.
खरीप हंगामात पेरणी करताना शेतकऱ्यांनी बियाणांची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सरी वरंबा पध्दतीचा वापर करावा. तसेच कोणत्याही बियाणांची पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करणे आवश्यक असून, त्यासाठी अडचण येत असल्यास कृषी सहायकांशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे यांनी केले आहे.