५६ निराधारांचे १७ लाख तहसील कार्यालयाकडे परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST2021-08-14T04:24:17+5:302021-08-14T04:24:17+5:30

जळकोट : निराधार योजनेअंतर्गतच्या ५६ लाभार्थ्यांना वाटपासाठी १७ लाखांचे अनुदान बँकेने तहसील कार्यालयाकडे परत केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांतून नाराजी ...

17 lakh of 56 destitute return to tehsil office | ५६ निराधारांचे १७ लाख तहसील कार्यालयाकडे परत

५६ निराधारांचे १७ लाख तहसील कार्यालयाकडे परत

जळकोट : निराधार योजनेअंतर्गतच्या ५६ लाभार्थ्यांना वाटपासाठी १७ लाखांचे अनुदान बँकेने तहसील कार्यालयाकडे परत केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाने ती रक्कम लाभार्थ्यांना वाटप करावी, अशी मागणी होत आहे.

निराधार लाभार्थ्यांसाठी विशेष सहाय्य विभागाकडून तहसील कार्यालयामार्फत मासिक अनुदान देण्यात येते. अनुदानाची रक्कम पूर्वी लाभार्थ्यांच्या हाती देण्यात येत होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ती त्या भागातील बँकांद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करून अदा करण्यात येत आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत अनुदानास पात्र असलेल्या ५६ लाभार्थ्यांसाठी तहसील कार्यालयामार्फत जिल्हा बँकेच्या अतनूर येथील शाखेस १७ लाख २६ हजारांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. हा निधी अतनूर, मेवापूर, सुल्लाळी, रावणकोळा, मरसांगवी, चिंचोली, गव्हाण आदी गावांतील निराधार लाभार्थ्यांसाठी होता.

दरम्यान, या अनुदानाची रक्कम बँकेत जमा झाल्यानंतर लाभार्थ्यांनी ठराविक कालावधीत उचलणे आवश्यक आहे. परंतु, ती उचलण्यात आली नसल्याने अखेर तहसीलदारांच्या पत्रानुसार ती रक्कम तहसील कार्यालयाकडे परत पाठविली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. वास्तविक योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यात लाभार्थी बेजार होतात. त्यामुळे ही रक्कम लाभार्थ्यांना देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

शासनाच्या पत्रानुसार रक्कम मागविली...

तहसील कार्यालयाच्या पत्रानुसार १७ लाखांची रक्कम प्रशासनाकडे वर्ग करण्यात आली आहे, असे बँकेचे शाखा व्यवस्थापक किशोर चव्हाण यांनी सांगितले.

शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम ठराविक कालावधीत बँकेतून उचलणे आवश्यक आहे. ती उचलण्यात आली नसल्याने शासनाच्या पत्रानुसार ती रक्कम तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्याचे पत्र देण्यात आले होते, असे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Web Title: 17 lakh of 56 destitute return to tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.