आरटीई सोडतीत १६०४ विद्यार्थ्यांची झाली निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:18 IST2021-04-18T04:18:52+5:302021-04-18T04:18:52+5:30
लातूर : आरटीई प्रवेशासाठी राज्यस्तरावर एकच सोडत जाहीर करण्यात आली होती. मात्र, पालकांना निवडीचे संदेश प्राप्त झाले नव्हते. शिक्षण ...

आरटीई सोडतीत १६०४ विद्यार्थ्यांची झाली निवड
लातूर : आरटीई प्रवेशासाठी राज्यस्तरावर एकच सोडत जाहीर करण्यात आली होती. मात्र, पालकांना निवडीचे संदेश प्राप्त झाले नव्हते. शिक्षण विभागाच्या वतीने गुरुवारी सायंकाळी लातूर जिल्ह्यातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये १ हजार ६०४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सदरील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्राची पडताळणी करून संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी जिल्ह्यातील २३८ शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली होती. जिल्ह्यात १ हजार ७४० जागा असून, यासाठी ४ हजार २४ अर्ज प्राप्त झाले होते. यंदा राज्यस्तरावर एकच सोडत जाहीर करण्यात आली होती. मात्र, पालकांना संदेश तसेच जिल्हा शिक्षण विभागाकडे यादी पाठविण्यात आली नव्हती. गुरुवारी सायंकाळनंतर यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये १ हजार ६०४ विद्यार्थ्यांची शाळानिहाय निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यातील ९७, औसा ७६, चाकूर ६८, देवणी ३४, जळकोट ५, लातूर ९४५, निलंगा १३५, रेणापूर २७, शिरूर अनंतपाळ १२, तर उदगीर तालुक्यातील २०५ अशा एकूण १ हजार ६०४ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणविस्तार अधिकारी दिलीप हैबतपुरे यांनी सांगितले.
तालुकास्तरावर होणार कागदपत्रांची पडताळणी...
आरटीई सोडतमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर असलेल्या पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. शिक्षण विभागाकडे नोंदणी केलेल्या शाळांना प्रवेशाबाबत योग्य त्या सूचना करण्यात आल्या असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विशाल दशवंत यांनी सांगितले.