१३५३ क्विंटल सोयाबीनची आवक; ७७५० रुपयांचा उच्चांकी दर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST2021-07-15T04:15:27+5:302021-07-15T04:15:27+5:30
लातूर : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी १ हजार ३५३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याला ७ हजार ८७० ...

१३५३ क्विंटल सोयाबीनची आवक; ७७५० रुपयांचा उच्चांकी दर !
लातूर : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी १ हजार ३५३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याला ७ हजार ८७० रुपयांचा कमाल, ७ हजार १०० रुपये किमान तर ७ हजार ७५० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. यंदाच्या हंगामातील हा उच्चांकी दर असून, सध्या शेतकरी शेतीकामात व्यस्त असल्याने शेतमालाची आवक घटली आहे. त्यामुळे दरात वाढ झाल्याचे बाजार समितीमधील चित्र आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी गूळ ४६५ क्विंटल, गहू ८४०, हायब्रिड ज्वारी ३, रब्बी ज्वारी १८४, पिवळी ज्वारी ३, हरभरा ७२९, तूर ५७१, करडी ४ तर १ हजार ३५३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. गुळाला ३ हजार २३० रुपये, गव्हाला २ हजार रुपये, हायब्रिड ज्वारीला ९०० रुपये, रब्बी ज्वारीला २ हजार रुपये, पिवळ्या ज्वारीला २ हजार २०० रुपये, हरभऱ्याला ४ हजार ५५० रुपये, तुरीला ६ हजार १५० रुपये, करडीला ४ हजार ८०० रुपये तर सोयाबीनला ७ हजार ७५० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. शासनाने सोयाबीनला ३ हजार ८७० रुपयांचा हमीभाव दिला आहे. त्या तुलनेत बाजार समितीत अधिकचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल बाजार समितीकडेच आहे. दरम्यान, जिल्ह्यात पेरणीची कामे झाली असून, फवारणी, कोळपणीची कामे सुरु आहेत. यामध्ये शेतकरी व्यस्त असल्याने बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक घटल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करत बाजार समिती प्रशासनाच्यावतीने व्यवहार पार पाडले जात आहेत.
हरभऱ्याला ४५५० रुपयांचा दर...
बाजार समितीमध्ये बुधवारी ७२९ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. त्याला ४ हजार ७०० रुपयांचा कमाल, ४ हजार २०० रुपये किमान तर ४ हजार ५५० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. सध्या शेतमालाची आवक घटली असून, बुधवारी ज्वारी, गहू, हरभरा, तूर, करडी, सोयाबीन आदी शेतीमालाची आवक झाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.