अहमदपुरातील प्रशासकीय इमारतीसाठी १३ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:20 IST2021-03-27T04:20:18+5:302021-03-27T04:20:18+5:30
अहमदपूर शहरात उपविभागीय कार्यालय मंजूर होऊन १० वर्षे उलटली तरी स्वतंत्र इमारत नव्हती. तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीमध्ये उपविभागीय कार्यालय ...

अहमदपुरातील प्रशासकीय इमारतीसाठी १३ कोटी
अहमदपूर शहरात उपविभागीय कार्यालय मंजूर होऊन १० वर्षे उलटली तरी स्वतंत्र इमारत नव्हती. तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीमध्ये उपविभागीय कार्यालय होते. तसेच शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय, सामाजिक वनीकरण, कृषी कार्यालय ही सर्व कार्यालये मुख्य कार्यलयापासून दूर होती. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतक-यांना त्रास होत होता. शहरात असलेले तलाठी सज्जे हे एकाच ठिकाणी नाहीत. त्यामुळे अधिकारी, कर्मचा-यांची भेट होत नाही. या अनुषंगाने आमदार बाबासाहेब पाटील यांनी पुढाकार घेऊन ही सर्व कार्यालये एकाच छताखाली व्हावीत म्हणून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी १३ कोटींचा निधी मंजूर करुन घेतला आहे. त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. हा निधी तीन वर्षांत खर्च करायचा असून सन २०२१-२२ मध्ये ४ कोटी ५० लाख, २०२२-२३ मध्ये ४ कोटी ५० लाख आणि २०२३-२४ मध्ये ४ कोटी ७ लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. सदर निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. यामुळे प्रशासकीय इमारतीमध्ये दोन मजले राहणार असून अग्निशमनरोधक यंत्रणा, रेन वॉटर हार्वेस्टिंगसह आधुनिक सुविधा राहणार आहेत.
नागरिकांची अडचण दूर होणार...
शहरात विविध ठिकाणी प्रशासकीय कार्यालये असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर अडचण होत होती. तहसील कार्यालयाच्या परिसरात योग्य जागी दोन मजली मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. लवकरच भूमिपूजन होणार आहे. त्याचा सर्वसामान्यांना फायदा होणार असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
भाडेतत्त्वावर कार्यालय...
मध्यवर्ती ठिकाणी तालुका कृषी अधिकारी, दुय्यम निबंधक कार्यालय, सामाजिक वनीकरण कार्यालय हे भाडे तत्त्वाच्या जागेवर असून मध्यवर्ती इमारत झाल्यानंतर सर्व कार्यालये एकाच इमारतीमध्ये येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांनी सांगितले.