१२ हजार क्विंटल हरभऱ्याची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST2021-03-27T04:19:47+5:302021-03-27T04:19:47+5:30
शहरात विजेचा लपंडाव; नागरिकांची गैरसोय लातूर : उन्हाचा उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, दुपारच्या वेळी बाहेर निघण्यास नागरिक नापसंती दर्शवीत ...

१२ हजार क्विंटल हरभऱ्याची आवक
शहरात विजेचा लपंडाव; नागरिकांची गैरसोय
लातूर : उन्हाचा उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, दुपारच्या वेळी बाहेर निघण्यास नागरिक नापसंती दर्शवीत आहेत. त्यातच विजेचा लपंडाव सुरू झाला असून, वीज गुल होत असल्याने उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वीज सुरळीत करण्यासाठी नागरिकांच्या वतीने महावितरणकडे तक्रारी केल्या जात आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. दुपारच्या वेळी होणारा लपंडाव थांबवावा, अशी मागणी होत आहे.
शाळा बंद असल्याने ऑनलाईन अभ्यासाचा उपक्रम
लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर शाळांच्या वतीने ऑनलाईन अभ्यासक्रम राबविला जात आहे. सकाळी आणि दुपारच्या सत्रात ऑनलाईन क्लासेस होत असून, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले जात आहे. दहावीच्या परीक्षा काही दिवसांवर आल्या असल्याने या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त क्लासेस ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत.
शहरात मोकळ्या प्लॉटवर कचरा
लातूर : शहरातील काही प्रभागांत नियमित घंटागाडी येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला, दुभाजकांमध्ये, मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. नियमित घंटागाडी सुरू करावी, अशी मागणी विविध वॉर्डांतील नागरिकांकडून महापालिकेकडे केली जात आहे. नियमित घंटागाडी सुरू झाल्यास कचऱ्याचे संकलन करण्यास मदत होणार आहे.
रस्त्यावरील बांधकाम साहित्य हटविण्याची मागणी
लातूर : शहरातील अनेक भागांतील रस्त्यांवर बांधकाम साहित्य टाकण्यात आले आहे. यामध्ये लोखंड, सळई, सिमेंट, वाळू, खडी, विटा, आदी साहित्याचा समावेश आहे. रस्त्याच्या मधोमधच बांधकाम साहित्य टाकल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे चारचाकी वाहन जाणेही अवघड होत आहे. याकडे शहर महापालिकेच्या पथकाने लक्ष देऊन बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
जिल्हा न्यायालय येथे ई-सेवा केंद्र
लातूर : पक्षकार व गरजू विधिज्ञांसाठी विविध सेवा पुरविण्यासाठी जिल्हा न्यायालयातर्फे ई-सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. तिवारी, एस.ए म. देशपांडे, हरीश भोईटे, जे. डी. चौधरी, बी. बी. दळवे, एम. के. कलशेट्टी, विष्णू कुलकर्णी, आदींसह न्यायालयीन कर्मचारी, विधिज्ञांची उपस्थिती होती. या सेवा केंद्राच्या माध्यमातून पक्षकार व विधिज्ञांना विविध सेवा पुरविण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, फायलिंग करून नंबर देण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनधारकांची गैरसोय
लातूर : शहरात रात्री आठ वाजेनंतर संचारबंदी असल्याने अनेक नागरिक सहा वाजल्यानंतर खरेदीसाठी जात आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. महात्मा गांधी चौक, राजीव गांधी चौक, दयानंद गेट परिसर, अंबाजोगाई रोड, रेणापूर नाका, आदी भागांत वाहतुकीची कोंडी होत आहे. अनेक ठिकाणी तर सिग्नल बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे शहर वाहतूक शाखेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
‘शिक्षण वाट’ या पुस्तकास साहित्य संस्थेचा पुरस्कार
लातूर : महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेच्या वतीने डॉ. जगन्नाथ शामराव पाटील लिखित ‘शिक्षण वाट’ या पुस्तकास पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. पाटील यांचे बाजार, नेताजी, जीवनमन, भक्ती, व्यक्ती आणि प्रकृती, जीवनगाणे, फाईल, घटस्फोटाच्या उंबरठ्यावर, जीवन अध्यात्म, आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘शिक्षण वाट’ या पुस्तकातून प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षण, शारीरिक शिक्षण, विविध विषयांवर त्यांनी मत व्यक्त केले आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी
लातूर : शहरातील बार्शी रोडवर दिवसभर मोठ्या वाहनांची वर्दळ असते. अनेक वाहने वेगाने धावतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावर एकही गतिरोधक नाही. संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेता, या मार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या रस्त्यावरच काही शैक्षणिक संस्थाही आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची ये-जा असते. म्हणून गतिरोधक बसविण्याची मागणी आहे.