लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामातील पेरणीसाठी तालुक्यातील विविध गावांमधील एकूण ११ शेतकरी गटांना बांधावर खत पुरवठा करण्याचे नियोजन येथील तालुका कृषी कार्यालयाने केले आहे. त्यासाठी कृषी सहाय्यकांची पथके सज्ज करण्यात आली आहेत. त्यामुळे गटातील शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात यंदा २८ हजार ५०० हेक्टरवर खरिपाची पेरणी होणे अपेक्षित आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या ३ हजार ८०० मेट्रिक टन रासायनिक खतांची आवश्यकता आहे. शेतकरी गटांना बांधावर खतांचा पुरवठा करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील कार्यरत असलेल्या विविध गावांमधील एकूण ११ गटांतील शेतकऱ्यांना बांधावर खते पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले. बांधावर खतांचा पुरवठा करण्यासाठी कृषी सहाय्यकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे गटातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
१ हजार ३४८ शेतकऱ्यांना लाभ...
शिरूर अनंतपाळ तालुक्यात ११ शेतकरी गट कार्यरत असून, त्यामध्ये एकूण १ हजार ३४८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. गटाच्या माध्यमातून बांधावर खतांचा पुरवठा केल्यामुळे भाडे तसेच ठोक खरेदी केल्यामुळे नफा होतो. त्यामुळे जवळपास हजारो शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी बांधावर खतांचा लाभ होणार आहे.
११६८ मेट्रिक टन खत पुरवठा...
तालुक्याला ३ हजार ८०० मेट्रिक टन रासायनिक खतांची गरज असली, तरी त्यापैकी १ हजार १६८ मेट्रिक टन खतांचा शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुका कृषी कार्यालयांतर्गंत असलेल्या एकूण ११ कृषी सहाय्यकांवर त्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचे तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, शिवप्रसाद वलांडे यांनी सांगितले.