अहमदपूर शहर, तालुक्यात १०७ कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:18 IST2021-03-22T04:18:01+5:302021-03-22T04:18:01+5:30
अहमदपूर तालुक्यात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, अवघ्या आठ दिवसांमध्ये रुग्णांची संख्या आता १०७ वर पाेहोचली आहे. लातूर ...

अहमदपूर शहर, तालुक्यात १०७ कोरोना रुग्ण
अहमदपूर तालुक्यात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, अवघ्या आठ दिवसांमध्ये रुग्णांची संख्या आता १०७ वर पाेहोचली आहे. लातूर जिल्ह्यातील २९४ पैकी २३ रुग्ण अहमदपूर तालुक्यातील होते. अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण असलेल्या गावांमध्ये रोकडा सावरगाव, ढाळेगाव, चिखली, अंधाेरी, वंजारवाडी, खंडाळी, हाडोळती, शिरूर ताजबंद, किनगाव, धानोरा बु. या गावांचा समावेश आहे. महसूल, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत १०७ रुग्णांपैकी २२ रुग्ण कोविड केअर सेंटर मरशिवणीयेथे उपचार घेत असून १० रुग्ण लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत तर उर्वरित आणि रुग्ण गृहविलगीकरणामध्ये आहेत. गृह विलगीकरणामधील रुग्ण नियमांचे पालन करण्याचे करत नसल्याचे दिसून आले असून, ते गावांमध्ये बिनधास्त फिरत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कोराेना रुग्णांची संख्या वरचेवर वाढत आहे. यासाठी दोन टास्क फोर्सची पथके तयार करण्यात आले आहेत. त्या पथकामध्ये एक पोलीस कर्मचारी, एक महसूल कर्मचारी, आरोग्य विभागाचे दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ग्रामीण आणि शहरी भागात गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांवर निरीक्षण करण्यासाठी या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णाला काेविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. तेथे दोन ते तीन दिवस उपचार केल्यानंतर गृहविलगीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात कडक निर्बंध...
ग्रामीण भागात गृहविलीनीकरणातील रुग्ण रस्त्यावर असून, त्यामुळे संसर्गाचा धोका वाढल्याचे समाेर आले आहे. त्याचबराेबर लग्न आणि धार्मिक समारंभातही मर्यादेपेक्षा अधिक लाेकांची गर्दी आढळून येत आहे. परिणामी, ग्रामीण भागात करण्यात आलेले निर्बंध अधिक कडक करण्याची गरज आहे. याबाबत अहमदपूर येथील तहसील कार्यालय बैठक घेण्यात आली आहे. त्यात प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी अमोल आंदलवाडी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रेय बिराजदार, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे, पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. सदर बैठकीत कडक उपाययोजना करण्याचा निर्णय झाल्याचे प्रभोदय मुळे म्हणाले.
व्यापाऱ्यांची काेराेना चाचणी लांबणीवर...
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या आदेशानुसार २१ मार्चपर्यंत सर्व व्यापाऱ्यांची आणि दुकानातील मजुरांची काेराेना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले हाेते. यासाठी व्यापाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. मात्र, ग्रामीण रुग्णालयात दररोज केवळ ३०० चाचण्या हाेत असून, त्यामुळे व्यापाऱ्यांची काेराेना चाचणी लवकर हाेत नाही तर इकडे अहमदपूर नगरपालिका त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत पत्र देत आहे. परिणामी, अहमदपुरातील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.