जळकोटातील १ हजार ४३२ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:20 IST2021-05-06T04:20:39+5:302021-05-06T04:20:39+5:30

तालुक्यात कोरोनाचा आलेख उतरला आहे. मंगळवारी तालुक्यात केवळ २१ नवीन कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांची चिंता कमी झाली ...

1 thousand 432 people from Jalkot defeated Corona | जळकोटातील १ हजार ४३२ जणांची कोरोनावर मात

जळकोटातील १ हजार ४३२ जणांची कोरोनावर मात

तालुक्यात कोरोनाचा आलेख उतरला आहे. मंगळवारी तालुक्यात केवळ २१ नवीन कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांची चिंता कमी झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू केले होते. तसेच गावोगावी जनजागृती करण्यात आली. तालुक्यातील प्रत्येक गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या. शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सुरुवात झाली. जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

पोलीस, आरोग्य, महसूल प्रशासन नागरिकांच्या दारापर्यंत जाऊन शासन नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले. त्यामुळे आठवडाभरापासून जळकोट तालुक्यातील कोरोनाचा आलेख उतरला आहे. तालुक्यासाठी ही समाधानाची बाब आहे.

जळकोटात नव्याने सुरू करण्यात आलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातील नवीन कोविड सेंटरमध्ये तीन नवीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणखीन एक एमबीबीएस व दोन बीएएमएस डॉक्टरांची आवश्यकता आहे. याशिवाय ऑक्सिजनची आवश्यकता असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता...

जळकोट येथील कोविड हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी, अशी सातत्याने मागणी होत आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु, अद्यापही तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती झाली नाही. तसेच एकही व्हेंटिलेटर मिळाले नाही. त्यामुळे गंभीर रुग्णांना उदगीर, लातूर, नांदेडला रेफर करावे लागत आहे. आरोग्य विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी तालुक्यातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

गृहविलगीकरणात ६९ जण...

तालुक्यात आतापर्यंत १ हजार ५८८ कोविड बाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी १ हजार ४३२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १२४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत कोविडमुळे ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. गृहविलगीकरणात ६९, कोविड केअर सेंटरमध्ये २२, ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये सात, तर उदगीर, लातुरात ३६ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांनी दिली.

Web Title: 1 thousand 432 people from Jalkot defeated Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.