जळकाेट तालुक्यातील गावांसाठी १ काेटी ३७ लाखांचा आराखडा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST2021-03-08T04:19:40+5:302021-03-08T04:19:40+5:30
जळकाेट येथील पंचायत समितीत घेण्यात आलेल्या बैठकीला सभापती बालाजी ताकभिडे, उपसभापती सुनंदा धर्माधिकारी, पाणीपुरवठ्याचे उपअभियंता संजय गरजे यांची प्रमुख ...

जळकाेट तालुक्यातील गावांसाठी १ काेटी ३७ लाखांचा आराखडा मंजूर
जळकाेट येथील पंचायत समितीत घेण्यात आलेल्या बैठकीला सभापती बालाजी ताकभिडे, उपसभापती सुनंदा धर्माधिकारी, पाणीपुरवठ्याचे उपअभियंता संजय गरजे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. ऑक्टोबर-डिसेंबर २०२० मध्ये ५६ लाख रुपये तर जानेवारी ते मार्च २०२१ साठी ३५ लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला. त्यापाठाेपाठ एप्रिल ते जूनसाठी ४६ लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या कृती आराखड्यामध्ये नळयोजना दुरुस्ती, नवीन पाईपलाईन मंजूर करणे, सतरा नवीन विंधन विहिरींना मंजुरी देणे, २० विंधन विहिरी दुरुस्त करणे, ७ नादुरुस्त नळयोजना दुरुस्त करणे, सहा टँकरने जिथे पाणीटंचाई आहे तिथे पाणीपुरवठा करणे, या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. २५ विंधन विहिरी अधिग्रहण करणे, अकरा विंधन विहिरी दुरुस्त करणे, विविध योजना दुरुस्त करणे, यातून पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार नाही. यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजय गरजे यांनी सांगितले.
टंचाई दूर करण्यासाठी प्रशासन सज्ज...
जळकोट तालुक्यात ४७ गावे असून, १५ ते २० वाडी-तांड्यांची संख्या आहे. प्रत्येक गावाला, वाडी-तांड्याला पिण्याचे पाणी कमी पडणार नाही, यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला पंचायत समितीच्या वतीने मंजुरी घेण्यात आली. यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्यात कुठेही टँकर लागण्याची शक्यता असल्याचे चित्र दिसून येत नाही. मात्र, वाडी-तांड्यावर पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी मदत करेल, असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. त्यासाठीच १ कोटी ३७ लाखांचा खर्च करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.