राशिवडेत वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण
By Admin | Updated: October 5, 2014 00:47 IST2014-10-05T00:42:50+5:302014-10-05T00:47:42+5:30
तरुणांवर उपचारात हेळसांड : आरोग्य केंद्रास कुलूप घालण्याचा प्रयत्न

राशिवडेत वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण
राशिवडे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यवस्थ तरुणास उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने तरुणांनी गोंधळ घातला. १०८ रुग्णवाहिकेवरील वैद्यकीय अधिकाऱ्यास जमावाने मारहाण केली. संतप्त तरुणांनी रुग्णांसह कर्मचाऱ्यांना आरोग्य केंद्राच्या बाहेर काढून कुलूप घालण्याचा प्रयत्न झाला. राधानगरी पोलिसांनी घटनेची माहिती घेतली.
आज, शनिवारी सकाळी राशिवडेतील एका तरुणास अत्यवस्थ स्थितीत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, येथे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र कांबळे उपस्थित नव्हते. तरुणाची ढासळणारी परिस्थिती पाहून जमावाचा संयम सुटला.
दरम्यान, १०८ रुग्णवाहिकेला फोन करून युवकास कोल्हापूर येथे पाठविण्याचा निर्णय घेतला. मात्र, या रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकारी अंघोळीसाठी गेल्याचे समजले. वैद्यकीय अधिकाऱ्यांविना रुग्णवाहिका पाठविण्यात आली. डॉ. शिंदे याठिकाणी पोहोचल्यानंतर संतप्त जमावाने प्रश्नांची सरबत्ती करून शिंदे यांना मारहाण सुरू केली. काहींनी आरोग्य केंद्रास कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सरपंच अतुल पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी वारंवार गैरहजर असल्याने असे प्रसंग घडत असून, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद कदम यांनी वैद्यकीय अधिकारी राजेंद्र कांबळे यांची चौकशी करून, त्यांचा अहवाल वरिष्ठांना पाठविणार असल्याचे सांगितले. वैद्यकीय अधिकारी राजेंद्र कांबळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)