जिल्हा परिषदेच्या आठ शाळा धोकादायक
By Admin | Updated: July 13, 2016 00:41 IST2016-07-13T00:26:57+5:302016-07-13T00:41:05+5:30
विद्यार्थ्यांचे हाल : दिंडनेर्ली, इस्पुर्लीमध्येही पडझड, भिंतींना ओलावा; फरशी पुसून बसविले जाते; प्रशासनाचे दुर्लक्ष

जिल्हा परिषदेच्या आठ शाळा धोकादायक
दिंडनेर्ली : मुसळधार पावसामुळे दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणाला तळ्याचे स्वरूप आले असून, दोन दिवसांपासून मैदानावरील पाणी बाहेर जाण्यासाठी मार्गच नसल्याने पाणी साचून राहिले आहे. या साचलेल्या पाण्यातच मुले खेळतात. याच शाळेच्या जुन्या इमारतीत अंगणवाडीचे वर्ग भरतात. या वर्गांमध्ये गळती सुरू असून, चिमुरड्यांची बसायची अडचण झाली आहे.
शाळेच्या वऱ्हांड्यामधील छपरावरील कौले फुटली असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पावसाचे पाणी भिंतीमध्ये मुरले असून, भिंती ओलसर झाल्याने भीतीदायक चित्र निर्माण झाले आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस सातत्याने फ रशी पुसून मुलांना बसवित आहेत; पण पावसाचे प्रमाण जादा असल्याने पाणी गळती सुरूच आहे. वेळोवेळी अंगणवाडी सेविकांनी ग्रामपंचायतीला व आपल्या विभागातील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असूनही कुणीच इकडे लक्ष देत नसल्याने मुलांना ओलसर फरशीवरतीच बसायची वेळ आली आहे.
एका अंगणवाडी इमारतीची कौले मंगळवारीच बदलली आहेत. या ठिकाणच्या मैदानात पाणी साचल्याने दुर्गंधी पसरून शाळेच्या मुलांना साथीच्या आजाराला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायतीने ताबडतोब पाण्याचा निचरा करावा. तसेच अंगणवाडीच्या मुलांना बसायची सोय करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.
दरम्यान, इस्पुर्ली (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळेच्या आर.सी.सी. इमारतींना गळती लागल्याने विद्यार्थ्यांना बसायची मोठी अडचण झाली आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी बांधलेल्या या षट्कोनी पाच खोल्यांमध्ये मागील दोन वर्षांपासून पाणी ठिबकत असून, याच परिस्थितीत मुले बसविली आहेत. मुख्याध्यापकांनी गेल्या दोन वर्षांपासून वेळोवेळी प्रशासनाला कळविले आहे. तसेच यावर्षीही एप्रिलमध्ये कळविले आहे; पण या गळतीकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही.
कार्यालयात व विजेच्या मीटरवर देखील पाणी ठिबकत आहे. त्यामुळे वर्गांची दुरुस्ती करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे. चालूवर्षी देखभाल दुरुस्तीसाठी एक लाख रुपये मंजूर झाल्याचे पत्र शिक्षण खात्याकडून आल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले; पण दुरुस्तीला ग्रामशिक्षण समिती व प्रशासनाला मुहूर्त कधी सापडतोय, हेच पाहावे लागणार आहे.
करपेवाडी, हालेवाडीतही गळती सुरूच; दुरुस्तीला मुहूर्त नाही
रवींद्र येसादे ल्ल उत्तूर
उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात करपेवाडी, हालेवाडी (ता. आजरा) येथील शाळेच्या इमारती या अत्यंत धोकादायक बनल्या आहेत. प्रशासनाला वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली नाही. एखादी मोठी जीवितहानी घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून होत आहे.
करपेवाडीत पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून, जुनी इमारत पडत आली आहे. पाच वर्षांपासून इमारतीचे निर्लेखन करून मिळत नाही. इमारतीच्या भिंतीची दगडे पडत आहेत. कैची तुटल्यामुळे छप्पर वाकले आहे. इमारतीत पाणी पडत आहे. शेजारीच असलेली अंगणवाडीची इमारतही धोकादायक बनली असून, मुलांना मंदिरात बसविण्यात येत आहे.