जिल्हा परिषद राबविणार ‘दिव्यांग उन्नती अभियान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:41 IST2018-06-22T00:41:20+5:302018-06-22T00:41:20+5:30

Zilla Parishad will organize 'Divyang Upgrity Campaign' | जिल्हा परिषद राबविणार ‘दिव्यांग उन्नती अभियान’

जिल्हा परिषद राबविणार ‘दिव्यांग उन्नती अभियान’

समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेने ‘दिव्यांग उन्नती अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांची नोंदणी, सविस्तर माहितीचे संकलन आणि त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध यंत्रणा राबविण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात येणार आहे.
सध्या समाजकल्याण विभागाच्या वार्षिक तीन टक्के निधीतून दिव्यांगांसाठीच्या योजना सुरू आहेत; परंतु जिल्'ातील दिव्यांगांंची परिपूर्ण अशी माहिती जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नाही. त्यांना ओळखपत्र देण्यापासून अनेक अडचणी निर्माण होत असताना, या सर्वांना सोप्या पद्धतीने सुविधा मिळाव्यात, यासाठी हे अभियान कार्य करणार आहे.
हे अभियान चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्व दिव्यांग व्यक्तींची १00 टक्के नोंदणी करून ती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात दिव्यांगत्व प्रमाणपत्र नसलेल्या लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.
तिसºया टप्प्यात दिव्यांगांसाठीची उपकरणे त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी तपासणी शिबिरे घेतली जाणार आहेत. चौथ्या टप्प्यामध्ये आरोग्य तपासणी करून संदर्भ सेवा, उपचार करणे, स्वावलंबन कार्ड दिले जाणार असून शासकीय योजनांचे मेळावे घेतले जाणार आहेत. तसेच जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर कार्यशाळाही घेण्यात येणार आहेत.
२१ प्रकारच्या दिव्यांगत्वाचा समावेश
या योजनेतून २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना लाभ दिला जाणार आहे. शासनाच्या जुन्या नियमानुसार अंध, बहिरे, मुके, हात, पायाने दिव्यांग, स्वमग्न अशा काही मोजक्या वर्गांतील दिव्यांगांचा समावेश केला जात असे. मात्र, आता केंद्र शासनाने नव्याने काही प्रकारांचा समावेश केल्याने त्याची दखल या योजनेमध्ये घेण्यात आली आहे. त्यानुसार पूर्णत: अंध, अंशत: अंध, कर्णबधिर, वाचादोष, अस्थिव्यंग, मानसिक आजार, अध्ययन अक्षम, मेंदूचा पक्षाघात, स्वमग्न, बहुविकलांग, कुष्ठरोग, बुटकेपणा, बौद्धिक अक्षमता, मांसपेशीय क्षरण, मज्जासंस्थेचे तीव्र आजार, मल्टिपल स्केलेरोसिस, थॅल्सेमिया, अधिक रक्तस्राव, सिकल सेल, अ‍ॅसिड अटॅक, कंपवात रोग हे प्रकार यामध्ये समाविष्ट आहेत.
रविकांत अडसूळ यांचा पुढाकार
नव्यानेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालेले रविकांत अडसूळ यांनी ही योजना तयार करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. त्यांनी पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना ही योजना सादर केली. त्यांच्या या संकल्पनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी कौतुक केले आहे.
२१ जणांची समिती
या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली २१ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष, सर्व विषयसमित्यांचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिष्ठाता- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, तहसीलदार संजय गांधी योजना, व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बॅँक, आगारप्रमुख एस. टी., महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक, दिव्यांग संघटनांचे दोन प्रतिनिधी, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी हे सदस्य म्हणून राहणार आहेत; तर जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. समन्वयक म्हणून सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी काम पाहतील.

Web Title: Zilla Parishad will organize 'Divyang Upgrity Campaign'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.