‘रिपाइं’चा जिल्हा परिषदेत ठिय्या

By Admin | Updated: September 3, 2015 23:56 IST2015-09-03T23:56:03+5:302015-09-03T23:56:03+5:30

मधाळे यांचे सेवानिवृत्तीचे लाभ प्रकरण : शिक्षणाधिकारी कक्षासमोर आंदोलन; कामकाज विस्कळीत

At the Zilla Parishad of 'RPI' | ‘रिपाइं’चा जिल्हा परिषदेत ठिय्या

‘रिपाइं’चा जिल्हा परिषदेत ठिय्या

कोल्हापूर : येथे जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कक्षासमोर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी गुरुवारी ठिय्या आंदोलन केले. आर्य समाज शिक्षण संस्थेच्या शाहू दयानंद व बा. कृ. पाटील संस्थेकडून जयवंत मधाळे यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ मिळू नयेत म्हणून त्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप करीत त्यांनी आंदोलन केले. यावेळी शिक्षण संस्था आणि शिक्षण प्रशासन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, शिक्षणाधिकारी जोत्स्ना शिंदे यांनी मधाळे यांचे सेवापुस्तक पोलीस बंदोबस्तात संस्थेकडून ताब्यात घेतले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर सुमारे दीड तास चाललेले आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शिष्टमंडळातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शाहू दयानंद शिक्षण संस्था व शासकीय अधिकारी यांनी जाणीवपूर्वक जयवंत मधाळे यांना निवृत्तीनंतर पेन्शन व अन्य लाभ मिळू नयेत, असे प्रयत्न केले आहेत. सूडबुद्धीने, जातीय द्वेषातून ते त्रास देत आहेत. मधाळे यांनी यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही. २९ मार्च २०१४ मध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर त्यांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला होता. मध्यंतरी सहा महिन्यांसाठी पेन्शन मंजूर झाली. त्यानंतर अनेकवेळा पाठपुरावा करूनही मुख्याध्यापक, संस्थाचालक, संबंधित लिपिक यांनी मधाळे यांचे निवृत्तिवेतनाची कागदपत्रे दिली नाहीत. ते टाळाटाळ करीत असून, पेन्शन न मिळाल्याने मधाळे यांच्या कुटुंबाची आर्थिक फरफट होत आहे.गुरुवारी दुपारी बारा वाजता रिपब्लिकनचे कार्यकर्ते, पदाधिकारी जिल्हा परिषदेत घुसले. त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कक्षासमोरच ठिय्या मारल्याने गोंधळ उडाला. यानंतर घोषणाबाजी, निदर्शने केल्यामुळे दीड तास शिक्षण विभागाचे कामकाज ठप्प झाले. कक्षाच्या प्रवेशद्वारातच ठिय्या मारलेल्या आंदोलकांनी वारंवार आत-बाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांना मज्जाव केला. परिणामी, काही काळ तणाव निर्माण झाला. शिक्षणाधिकारी शिंदे यांच्याकडून सेवापुस्तक ताब्यात घेण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.आंदोलनात रिपब्लिकनचे विलास भामटेकर, सुखदेव बुध्याळकर, एस. डी. कांबळे, बी. डी. पाटील, राम पाटील, रूपा वायदंडे, संजय जिरगे, राहुल कांबळे, प्रताप बाबर, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)


फौजदारी गुन्हा दाखल करा...
मधाळे यांची आर्थिक कोंडी झाली आहे. मानसिक ताण वाढल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनल्यामुळे ३१ आॅगस्टला त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्या जीवितास धोका झाल्यास संस्थाचालक अ‍ॅड. दिलीप पाटील, मुख्याध्यापक, लिपिक राजेंद्र कांबळे, शिक्षणाधिकारी जोत्स्ना शिंदे, उपसंचालक मकरंद गोंधळी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे.
शिक्षण प्रशासनाने वेळोवेळी मधाळे यांना मदत केली आहे. संस्थाचालकांकडून कागदपत्रे मिळण्यात अडचणी आहेत. यासंबंधी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी झाली आहे. मी स्वत: लक्ष घालून मधाळे यांच्या प्रकरणाचा वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केला आहे. तरीही माझ्या कक्षासमोर आंदोलन करणे कितपत योग्य आहे?
- जोत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

Web Title: At the Zilla Parishad of 'RPI'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.