जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पती, मुलाला मारहाण
By Admin | Updated: November 10, 2016 00:52 IST2016-11-10T00:55:38+5:302016-11-10T00:52:07+5:30
पत्नीच्या निलंबनाचा राग : शिक्षक नेते ए. के. पाटील यांच्यावर गुन्हा, आमशीतील राजकारणामुळे जिल्हा परिषदेची बदनामी

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पती, मुलाला मारहाण
कोल्हापूर : पत्नीच्या निलंबनाच्या रागातून शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष ए. के. पाटील आणि त्यांच्या मुलाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील यांचे पती पुंडलिक पाटील व मुलगा प्रकाश यांना जोरदार मारहाण केली. जिल्हा परिषद इमारतीतील प्रवेशद्वारातच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली.
याबाबत ए. के. पाटील यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली. पुंडलिक पाटील यांना नंतर रडू कोसळले.
मुख्याध्यापक असलेल्या पाटील यांनी जिल्हा परिषदेत येऊन मारहाण केल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. या दोघांचेही गाव आमशी (ता. करवीर) एकच असल्याने यामध्ये स्थानिक राजकारणाचाही संदर्भ आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील जिल्हा परिषदेत नव्हत्या. ए. के. पाटील आणि पुंडलिक पाटील हे दोघेही काँग्रेसचेच आहेत. दुपारी चारच्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना भेटून पुंडलिक पाटील, शिक्षण समितीचे सभापती अभिजित तायशेटे, तसेच शिक्षण समितीचे सदस्य खाली येत होते. पाटील तेथे येताच ए. के. पाटील आणि मुलगा अवधूत यांनी पुंडलिक यांची गळपटी धरून त्यांना चौकशी कक्षापलीकडील कोपऱ्यात नेऊन मारहाण केली. गोंधळ उडाला. आरडाओरडा सुरू झाल्याने सर्वजण सोडविण्यासाठी धावले. अभिजित तायशेटे आणि त्यांचे स्वीय सहायक सागर चव्हाण यांनी ही झटापट सोडविली. पुंडलिक यांचे चिरंजीव प्रकाश हे काही मिनिटांपूर्वी पहिल्या मजल्यावर गेले होते. त्यांनीही खाली येत वडिलांना सोडविले. केवळ चार मिनिटांमध्ये हा प्रकार घडला. लगेचच ए. के. पाटील आणि त्यांच्या मुलाने जिल्हा परिषदेतून पळ काढला.
संतप्त सदस्यांची सीईओंकडे धाव
या प्रकारानंतर संतप्त सदस्यांनी मुखय कार्यकारी अधिकारी खेमनार यांच्याकडे धाव घेतली. कुंडलिक पाटील, अभिजित तायशेटे, अरुण इंगवले, सुरेश कांबळे, राहुल देसाई, अर्जुन आबिटकर, सावकर मादनाईक, माजी सदस्य दत्ता घाटगे यांनी निषेध करीत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले ही यावेळी उपस्थित होते. आपल्या २५ वर्षांच्या काळात असा प्रकार कधी घडला नव्हता, असे इंगवले यांनी सांगितले. तर हे अधिकाऱ्यांसाठीही धोकादायक असल्याचे अर्जुन आबिटकर म्हणाले. यानंतर सर्वजण शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी रवाना झाले.
ए. के. पाटील यांनाही केले होते निलंबित
ए. के. पाटील हे शिक्षक बँकेचे चेअरमन होते; परंतु त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. ते सध्या करवीर तालुक्यातील पासार्डे येथे मुख्याध्यापक आहेत; परंतु खुपिरे येथे असताना शाळेत भेट देण्यासाठी गेलेल्या तत्कालीन पंचायत समिती सदस्य संगीता पाटील यांना कोंडून ठार मारण्याची त्यांनी धमकी दिली होती. या चौकशीसाठी गेलेल्या विस्तार अधिकारी आर. व्ही. कांबळे यांच्यादेखत पाटील यांचा जबाबही फाडला होता. उपशिक्षणाधिकारी डी. एस. पोवार यांच्या अहवालानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी २३ मार्च २0१२ ला निलंबित केले होते. पुणे विभागीय आयुक्तांकडे निलंबनाविरोधात अपील केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी त्यांना पुन्हा सेवेत घेतले होते. यानंतर चंदगड तालुक्यात नियुक्ती केली होती. ५३ वर्षांच्या अटीचा फायदा घेत ते करवीर तालुक्यात रुजू झाले होते.
ए. के. यांचे निलंबन शक्य
मुख्याध्यापक पदावर असताना जिल्हा परिषदेत येऊन मारहाण करणाऱ्या ए. के. पाटील यांची विभागीय चौकशी करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले. ते रजेवर होते का? याची चौकशी होत आहे. तरीही शासकीय आचारसंहितेचा भंग त्यांनी केल्याने ही चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. यामुळे ए. के. यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.