जिल्हा परिषद भरती परीक्षा २ नोव्हेंबरला-उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी. एन. वाघमारे
By Admin | Updated: October 23, 2014 00:02 IST2014-10-22T23:01:02+5:302014-10-23T00:02:40+5:30
२९ आणि ३१ आॅक्टोबरला जिल्हा परिषदेमध्ये पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र

जिल्हा परिषद भरती परीक्षा २ नोव्हेंबरला-उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी. एन. वाघमारे
कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेच्या ‘वर्ग-३’, ‘वर्ग-४’च्या १९४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी तब्बल १८ हजार ३९८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), पर्यवेक्षिका (महिला), शिक्षण विस्तार अधिकारी या पदासाठी २ नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने तयारी पूर्ण केली आहे. या परीक्षेसाठी २९ आणि ३१ आॅक्टोबरला जिल्हा परिषदेमध्ये पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र दिली जातील, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) सी. एन. वाघमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जिल्हा परिषदेने २० आॅगस्टपासून रिक्त असलेल्या कनिष्ठ अभियंता, आरोग्य सेवक यासह विविध विभागांतील रिक्त १९४ पदांची जम्बो भरती प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासनातर्फे सुरू केली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. अठरा हजारांवर अर्ज आले. दरम्यान, भरतीमध्ये महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन, अपंग यासाठी राखीव जागा आहेत. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - ५, आरोग्य सेवक (महिला) - ३१, शिक्षण विस्तार अधिकारी - २ ,पर्यवेक्षिका (महिला) - १, वरिष्ठ साहाय्यक (लेखा) - २, औषध निर्माण अधिकारी - २, आरोग्य सेवक (पुरुष) - १३, कनिष्ठ
आरेखक - ६, कंत्राटी ग्रामसेवक - ५३, स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक - ३०, वरिष्ठ साहाय्यक (लिपिक) - २,
परिचर-४३, कनिष्ठ साहाय्यक-२, कनिष्ठ लेखाधिकारी -१ असे १९४ जागांसाठी भरती सुरू आहे. अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. (प्रतिनिधी)
अपात्र अर्जांची संख्या जास्त
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), पर्यवेक्षिका (महिला), शिक्षण विस्तार अधिकारी पदांसाठी आलेल्या अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पाच जागांसाठी २६६ अर्ज आले होते. यापैकी १६ अर्ज अपात्र ठरले. पर्यवेक्षिका (महिला) साठी आलेल्या ५२८ अर्जांपैकी ६९ अर्ज अपात्र ठरले. शिक्षण विस्तार अधिकारीपदासाठी ५२९ अर्जांपैकी तब्बल ३८८ अर्ज अपात्र ठरले. चुकीची शैक्षणिक पात्रता, निर्धारित केलेली जात नसणे, वयोमर्यादा ओलांडणे, आदी कारणांमुळे अपात्र ठरले आहेत. या पदांसाठी पात्र उमदेवारांची परीक्षा २ नोव्हेंबरला होणार आहे. उर्वरित पदांसाठी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी, रविवारी परीक्षा घेण्याचा विचार आहे.
परीक्षा केंद्रे...
शहाजी कॉलेज व नेहरू हायस्कूल विद्यापीठ हायस्कूल
देशभूषण हायस्कूल
न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल
राधाबाई शिंदे इंग्लिश मेडियम स्कूल
महावीर कॉलेज
पद्माराजे गर्ल्स हायस्कूल,
उषाराजे हायस्कूल
तवन्नाप्प्पा पाटणे हायस्कूल
प्रायव्हेट हायस्कूल
महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स (एमएलजी) हायस्कूल
इंदुमती गर्ल्स हायस्कूल
महाराष्ट्र हायस्कूल.