जिल्हा परिषदेत आता ‘साहेब, भागात गेलेत’ ही थाप बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:25 IST2021-09-11T04:25:04+5:302021-09-11T04:25:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा परिषदेत अनेक वेळा विभागप्रमुखांच्या दालनात चौकशी गेल्यानंतर ‘साहेब किंवा मॅडम भागात गेल्यात’ म्हणून ...

जिल्हा परिषदेत आता ‘साहेब, भागात गेलेत’ ही थाप बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा परिषदेत अनेक वेळा विभागप्रमुखांच्या दालनात चौकशी गेल्यानंतर ‘साहेब किंवा मॅडम भागात गेल्यात’ म्हणून सांगण्यात येते; परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी ‘आपल्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये,’ अशा सक्त सूचना सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत. त्यामुळे आता ऊठसुट भागात जाण्यावर मर्यादा येणार आहेत.
जिल्हा परिषदेमध्ये गेली अनेक वर्षे सोमवारी आणि शुक्रवारी या दोन्ही दिवशी सर्व अधिकाऱ्यांना मुख्यालयामध्ये थांबणे बंधनकारक करण्यात आले आहे; कारण या दोन्ही दिवशी पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे सदस्य, अभ्यागत मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेत येत असतात. या स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम बारा तालुक्यांत असल्याने विभागप्रमुखांनाही या सर्व तालुक्यांतील फिरती अनिवार्य आहे. विविध पंचायत समित्यांच्या मासिक बैठकांनाही विभागप्रमुखांनी उपस्थित राहावे, अशा सूचना आहेत.
परंतु अनेकदा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाला पूर्वकल्पना न देता विभागप्रमुख दौऱ्यावर जाण्याचे प्रकार वाढले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे मुंबई दौऱ्यानंतर शक्यतो जिल्ह्यातच असतात. अशा वेळी अनेकदा काही माहिती हवी असल्यास अडचण होते. तसेच कोरोना काळात तातडीने काही निर्णय घ्यायचे असल्यास विभागप्रमुख भागात गेले असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच चव्हाण यांनी पूर्वपरवानगीशिवाय तालुका दौऱ्यावर जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत.